भीती निर्माण करणे सोपे असते. ‘आपण’ आणि ‘ते’ अशी भिंत उभी करणेही सोपे असते; पण त्या भिंती तोडून एकत्र जगण्याचा संदेश देणे कठीण असते. राहुल गांधींच्या भूमिकेत या ऐक्याचा आग्रह दिसतो.
पुणे ही केवळ विद्येची नगरी नाही, तर सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. सावित्रीबाई फुले यांनी याच मातीत स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्याच पुण्यात ‘छात्रगुंज’ कार्यक्रमातून तरुणींनी आपल्या प्रश्नांना आवाज दिला. राहुल गांधींनी या संवादातून स्त्री-स्वातंत्र्य, समानता, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे केंद्रस्थानी आणले. त्यामुळे हा कार्यक्रम नव्या सांस्कृतिक संघर्षाची चाहूल देणारा ठरला.
पुणे ही विद्या नगरी. सामाजिक परिवर्तनाची भूमी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी. त्यांनी याच मातीत स्त्री शिक्षणाचा पहिला दिवा पेटवला. त्या दिव्याची ज्योत अद्याप कायम आहे. आता काळ बदलला. पिढ्या बदलल्या. त्याच पुण्यात तरुणींच्या आवाजातून ती ज्योत पुन्हा प्रज्वलित होताना दिसली. निमित्त विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा छात्रगुंज कार्यक्रम होता. त्यांनी मुलींशी संवाद साधला. हा स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, समानतेचा होता. तिच्या अस्तित्वावर अधिकाराचा सांस्कृतिक घोष होता. पुण्यातील तरुणींची गर्दी हेच या कार्यक्रमाचे पहिले उत्तर होते. त्यातून व्यक्त झालेला उत्साह, अस्वस्थता आणि प्रश्न विचारण्याची तयारी महत्त्वाची होती. त्यांनी आपला पुणेकरी आवाज ऐकविला. त्यातून महिलांची स्थिती समोर आली. राहुल गांधींनी त्या आवाजाला शब्द दिले. स्त्री म्हणजे केवळ आई, मुलगी, पत्नी नाही. तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिचे विचार आहेत, तिची स्वप्ने आहेत, तिच्या निवडीचा अधिकार आहे; पण भारतीय समाज व्यवस्थेने शतकानुशतके तिच्या अस्तित्वाभोवती पुरुषसत्तेची कुंपणे उभी केली. घरापासून समाजापर्यंत, धर्मापासून राजकारणापर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता रुजवली. राहुल गांधींनी याच मानसिकतेवर नेमके बोट ठेवले. मनुस्मृतीने महिलांना गुलाम केले. त्या मानसिकतेचा पिंजरा तोडा, हा संदेश दिला. हा भारतीय समाजातील स्त्री-पुरुष असमानतेच्या दीर्घ इतिहासावर केलेला प्रहार होता. महात्मा फुले यांनी ब्राह्मणी पुरुषसत्तेला प्रश्न विचारला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या दगडांचा मारा सहन करत मुलींसाठी शाळा चालवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. यातून सामाजिक गुलामगिरीच्या विचारसरणीला उघड आव्हान दिले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील एखादा प्रमुख नेता मनुस्मृतीच्या सामाजिक परिणामांवर इतक्या स्पष्टपणे बोलला. त्यांनी मनुस्मृतीचा संदर्भ देत मुलींच्या जगण्याशी त्याचा संबंध जोडला. मुलांनी शिवी दिली, तर ती मस्ती मुलींनी शिवी दिली तर संस्कृती धोक्यात आली, असे का? यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंतरमंतर बाबतच्या विधानाचा समाचार घेतला अन् विद्यार्थिनींच्या टाळ्यांचा पाऊस बरसला.
स्त्रीच्या कपड्यांवर, आवाजावर, वागण्यावर, मैत्रीवर, प्रेमावर आणि स्वप्नांवर समाजाचा पहारा का? हा प्रश्न राहुल गांधींच्या संवादातून पुढे आला. त्यांच्यावर संस्कृती लादणारे हजारो आवाज असतात; पण त्यांच्या मनातील प्रश्न ऐकणारे आवाज कमी असतात. राहुल गांधींनी त्या न ऐकल्या गेलेल्या प्रश्नांना मंच दिला. यातून ‘गर्ल पॉवर’चा नारा सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाशी जोडला गेला. राहुल गांधींनी नीट परीक्षेतील गैरव्यवस्था, प्रश्नपत्रिका फुटीचे आरोप, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या व्यवस्थेतील त्रुटी यावर आवाज उचलला. कोटा, डेहराडून आणि प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. हा विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेचा आरसा होता. पुण्यात मात्र त्यांनी त्या आंदोलनाला वेगळे वळण दिले. यावेळी विद्यार्थी नव्हे, तर विद्यार्थिनी केंद्रस्थानी होत्या. ही निवड राजकीयदृष्ट्या सूचक आहे. आजची तरुणी परीक्षेतील यशासाठी झगडत आहे. सोबत स्वतःच्या अस्तित्वासाठीही संघर्ष करते, तिला शिक्षण हवे, रोजगार हवा, सुरक्षितता हवी, समान संधी हवी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य हवे. त्या पिढीशी राहुल गांधींनी संवाद साधला.
त्यांच्या राजकीय प्रवासातील हा बदल आहे. ते पारंपरिक राजकारणाच्या चौकटीबाहेर आले. ते आता तरुण, विद्यार्थी, महिला, वंचित आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना जोडणारी नवी राजकीय भाषा वापरताना दिसतात. त्यात जातीनिहाय जनगणना, ओबीसींचा प्रतिनिधित्वाचा प्रश्न, सामाजिक न्याय, शिक्षणातील समान संधी, स्त्री-पुरुष समानता आणि धार्मिक सलोखा या सगळ्या मुद्यांना त्यांनी एका व्यापक सामाजिक न्यायाच्या चौकटीत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाला धर्माच्या नावाने विभागणे सोपे असते. भीती निर्माण करणे सोपे असते. ‘आपण’ आणि ‘ते’ अशी भिंत उभी करणेही सोपे असते; पण त्या भिंती तोडून एकत्र जगण्याचा संदेश देणे कठीण असते. राहुल गांधींच्या भूमिकेत या ऐक्याचा आग्रह दिसतो. म्हणूनच पुण्यातील छात्रगुंज कार्यक्रम राजकारणाच्या भाषेतील सांस्कृतिक बदलाचा प्रयोग ठरला.
भाजपने गेल्या बारा वर्षांत धर्म, सोयीचा राष्ट्रवाद, श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मिता या मुद्याभोवती आपली राजकीय भाषा उभी केली. त्याला राहुल गांधी आता सामाजिक न्याय, जातीय जनगणना, मोहब्बत की दुकान, हिंदू-मुस्लीम सलोखा, समानता, तरुणाई आणि स्त्री-मुक्तीच्या माध्यमातून पर्याय उभा करतात. ते नवा अजेंडा निर्माण करीत आहेत. सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान देत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी होत आहे.
धर्माच्या राजकारणाला धर्माच्या राजकारणाने उत्तर. ही पारंपरिक राजकीय पद्धत होती. राहुल यांनी ती त्यागली. आता समान शिक्षण, रोजगार, आरोग्य सोयी, जातीय जनगणना, महिला समानता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे प्रश्न पुढे केले. ही नवी राजकीय आयुधे आहेत. ती त्यांनी पुण्यात वापरली. जेन-झी पिढीशी संवादाची भाषा अवगत केली. या पिढीला प्रश्नांची उत्तरे हवीत. ती अधिकाराविषयी बोलते, मानसिक स्वातंत्र्यावर बोलते, लिंग समानतेविषयी बोलते, शिक्षण आणि रोजगारावर बोलते. या पिढीच्या प्रश्नांना राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी पुण्यात आणले. त्यामुळे छात्रगुंज ‘गर्ल पॉवर’चा कार्यक्रम ठरला. हा नव्या सांस्कृतिक सत्ता संघर्षाचा संकेत आहे.
सत्ता केवळ संसदेत नसते, सत्ता घरात असते, शाळेत असते, महाविद्यालयात असते, धर्माच्या व्याख्येत असते, कुटुंबाच्या निर्णयात असते, स्त्रीच्या निवडीवर असते, समाजाच्या नैतिकतेच्या निकषांमध्ये असते. या सगळ्या सत्ता केंद्रांना प्रश्न विचारणे म्हणजेच सांस्कृतिक राजकारणाला आव्हान देणे होय. पुण्यात राहुल गांधींनी नेमके तेच केले. सावित्रीबाई फुले यांच्या भूमीत मुलींशी संवाद साधताना त्यांनी स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ घेत मनुस्मृतीच्या मानसिकतेवर प्रहार केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामाजिक न्यायाशी जोडले. राहुल यांची अलीकडील वाटचाल नवी राजकीय मांडणी आहे. त्यात ओबीसींसाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश आहे. शिक्षण व्यवस्थेतील बदलाची गरज आहे.
पुण्याच्या भूमीत तरुणींना उद्देशून समानतेचा आवाज उमटणे, ही साधी राजकीय घटना नाही. त्यामुळेच छात्रगुंजेतील तो आवाज सत्तेच्या कानावर अधिक मोठा ऐकू गेला. बारा वर्षांत राजकारण बदलले, सत्तेची समीकरणे बदलली; पण समाजाच्या मुळाशी असलेले प्रश्न अजूनही कायम आहेत. आता त्या प्रश्नांना नवी पिढी नवे शब्द देत आहे. पुण्यातील तरुणींची गर्दी हा त्याच बदलाचा परिणाम आहे. त्यांच्या हातात प्रश्नांच्या हातोडा आहे. तो जर जुन्या पुरुषसत्ताक मानसिकतेच्या, जातीय विषमतेच्या, धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि शिक्षणातील अन्यायाच्या भिंतीवर आदळला, तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाची नवी पहाट उगवू शकते. पुण्यातून आलेला हा आवाज म्हणूनच सांस्कृतिक झटका आहे. राजकारणाची दिशा बदलण्याचा संकेत आहे.
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर,
मो. ९८३४२४५७६८