अर्धा खरीपाचा हंगाम अटपला तरी कर्जमाफीची यादी जाईर व्हतेच हाये! जुलै मयन्यात पयली यादी आता दुसरी मंग तिसरी अन आखरीले उरले-सुरले घेतील; पन तदलोग तो कास्तकार ‘जीता’ रायते का मरते हे कोनाले ठावूक हाये?
उरे रामराम हो राजोट्याईले अन हेंबाळ्या खोट्या आस्वासनाच्या राजकारनाले ‘कटायेल’ मंडळी! औंदा तं बावा गोरगरीब जनता अन कष्टकरी शेतकरी या ‘लबाळ’ राजकारनाले अन अभायातल्या कायाकुट्ट ‘ढगाईले’ बेज्याच कटायले! गेल्या तीस जुनपासून कर्जमाफीच्या निर्नयाच्या अंमलबजावनीची ‘तारीख पे तारीख’ची घोषना शिदोळावानी लांबोवून सरकार शेतकऱ्याले ‘च्युवत्या’ बनोवून रायलं! जसं सरकार ‘आंटी की घंटी वाजोते’ तसच काम अभायातले पान्यानं डचाडच भरेल कायेकुट्ट ढग शेतकऱ्याच्या ‘चेंढायन्या’ करुन रायले!
अर्धा खरीपाचा हंगाम अटपला तरी कर्जमाफीची यादी जाईर व्हतेच हाये! जुलै मयन्यात पयली यादी आता दुसरी मंग तिसरी अन आखरीले उरले-सुरले घेतील; पन तदलोग तो कास्तकार ‘जीता’ रायते का मरते हे कोनाले ठावूक हाये? जे थकीत व्हते तेईच कर्ज माफ व्हून रायलं; पन जे हरसाल ‘नवं-जुनं’ कर्ज करतात तेईले जबरदस्तीची ‘गच्यांडी’ या लबाळ सरकारनं देली! म्हंजे शेतकऱ्याले सरकारचा भरोसा नाई तसा अभायातल्या ढगाईचाबी भरोसा रायला नाई! ‘ना आदयनी ना मुरतोनीचं पानी अन भुरभूरी-कळक उनानं पीकाले बसते गपकनी’!
जसी कर्जमाफीनं शेतकऱ्याची ‘दमकोंडी’ केली तसीच ढगाईनबी ‘चेंढायन्या’ केल्या, तरी शेतकऱ्यानं सावकारीचं कर्ज काळून कशीतरी पेरनी केली! पेरनी अटपली पन पान्यानं ‘कुठी कनभर तं कुठी मनभर’ अन जथी पायजे नाई तथी ‘अजीर्न’ व्हयेलोग ढग बरसले! आमच्या ईदर्भात तं पावसायाभर ‘भुरभुरी’ चालू व्हती! भलाई हवामान खात्यानं रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जाईर केले तरी पान्यानं ‘हेकळपना’ सोळला नाई!
शेतकऱ्यानं तुर पेरली पन डुकराईनं खाल्ली! बियाने कंपन्याईच्या बोगस बियान्यानं सोयाबीनचा ‘टांगा पलटी घोळा फरार’ झाला! पराटी फुलपात्यावर आली; पनं ढगातलं बदबद पानी नसल्यानं ‘सोकली-चिमली अन झोपली’! म्हंजे औंदाचा खरीप हंगामात शेतकरी चारीमुंड्या चित झाला अन उरावरच्या कर्जानं त्याले आता गयफासाबगर कोन्ताच ईलाज नाई!
येकाईकळे ना आपल्या महाखटल्यातली भरोशाची ‘नाथाभौ-देवाभौ’ची धुरकऱ्याची ‘गोळजोळी’ वदरुन आपल्याले ‘अतुटगोळ’ वाटत असली, तरी अंदरुन तं ईच्यामायले खुर्चीसाठी येकमेकावर बारोमास ‘कुरघोळी’ करातच गुतली हाये! उलसीक अळचन आली का गचकन दिल्लीवारी करतात! शेंड्यावरच्या मोठ्याबाबाचा आशिर्वाद घ्याले दरबारात बारी लावतात!
पयलेच तं बापहो ‘काॅक्रोज’च्या झटक्यानं दिल्लीतल्या छप्पनईंची छातीवाल्या बाबाची छाती थरथरली अन घाम फुटून खाली पळ्यावर आली! त्यातच ईच्यामायले जयश्रीरामाच्या देवळातली दानाची चोरी पुजाऱ्याईनच केल्यावर ‘बोला जय श्रीराम अन जनतेले लुट्याच येकच काम’ झाल्यानं ढोंगी ‘रामभक्ताईले’ जनतेले तोंड दाखोयाची लायकी रायली नाई! दिल्लीतलं सरकार ईकासाच्या नावाखाली ईतकं फुटकं झालं, की कोन्तीबी सरकारी योजना बुळातल्या लोकालोग शंभरटक्के पोहचतच नाई! मंधातल्या मंधाथच तीले फाटे फुटतात अन सरकारी अधिकारीच त्याचा फायदा घेतात! तशीच गोठ या कर्जमाफीची झाली! ईदर्भातल्या शेतकऱ्यापरस मुंबई-पुन्यातल्या बिल्डर- उद्योगपतीच्या ‘शेतीपुरक’ कर्जाले फुल्ल कर्जमाफी भेटली अन ईदर्भातल्या शेतकऱ्याले ‘उंटाच्या तोंडात जीरं’ टाकल्यावानी या हेंबाळ्या ‘चतऱ्या सरकार’नं कर्जमाफी केली!
जसं निवळनुकीच्या आंदी ‘लाळक्या बयनी’ले लाळकपनानं ‘दे दान तं सुटे गिरान’वानी पयसा वाटप केला अन निवळुन आल्यावर अटी-शर्ती टाकून ‘कटछाट’ करुन अर्ध्या बयनी योजनेतून बाद झाल्या! तसीच हे कर्जमाफीची योजना टप्प्याटप्प्यानं शिदोळावानी तारीख लांबोवून शेतकऱ्याची गयचेपी केली!
मोठमोठ्या उद्योगपतीले हे हेंबाळं सरकार करोळो रुपयाची कर्जमाफी देते अन कॄषीप्रधान देशातल्या बळीराजाले दोन लाखालोग कर्जमाफीसाठी कीती चेंढायन्या करुन ‘च्युवत्या’ बनोते? ‘अच्छे दिनाच्या ग्यारंटी’चं सरकार यालेच म्हंतात काय?
येकाईकळे अभायाले टेकेल म्हागाई, गॅस-पेटोलचा भळका, तेल-साखर, कीरान्याचे बेधळक वाढेल भाव, वदरुन पान्याचा भुरभुरी मंग अशा कठीन काळात गोरगरीब जनतेनं कष्टकरी शेतकऱ्यानं कसं काय जीवन जगावं का गयफास घीवून मरावं?
येकाईकळे कर्जमाफीच्या आशेवर शेतकरी कसातरी जगून रायला अन दुसऱ्याईकळे नाथा-देवाभौचं खुर्चीसाठी ‘ओळातान’ सुरु हाये! वदरच्या मोठेबाबाची ‘ग्यारंटी’ असल्यानं देवाभौ खुस हायेत पन नाथाभौची पक्ष अन चिन्हाची अळचन कोर्टात शेवटच्या टप्प्यात आल्यानं कायजाची धाकधुक वाळली हाये! पन बापहो तुमच्या मनात-कानातल्या गुदगुल्याईनं गोरगरीब जनता अन कष्टकरी शेतकरी चारीमेरीच्या ईचुकाट्यात अटकला हाये ना?
राजोटे तं शेतकऱ्याच्या बारोमास चेंढायन्या करतातच पन औंदा अभायातले कायेकुट्ट ढगबी बेज्याच बेभरोशाच्या चेंढायन्या करुन रायले ना! हवामान खात्याचे सारे अंदाज, येलो अलर्ट फेल गेले अन शेतकरी या बेभरोशाच्या जीनगानीनं कोमात गेले!
मायबाप सरकारा, तुमच्या मनातलं येकमेकमेकाच्या कानात सांगा का आश्रमात जावून चर्चा करा पन हे उरफाट्या ‘डावपेचा’ची कपटनिती, खोट्या आस्वाशनाचं पाठीवरचं बिर्हाळ जनतेपुळे मांडा लागील ना बावा?
नाई तं सदाई मले-तुमाले येकच गानं म्हना लागील...!
काय तुया मनात, सांग माया कानात...
माया जीवाभावाच्या, अभद्र युतीतल्या
कमळाच्या ‘डावपेची’ सुगंधी फुला...?
मले ग्यारंटी हाये दिल्लीश्वराची
पक्ष-चिन्हाची गोठ नाई कामाची!
छाकट्या दोस्तान्यावर नाई भरोसा
कमळाच्या जायात अटकला मासा!
घळीभर चल जावू गळ्या...
गुवाहाटीच्या आश्रमात...ऽऽ!
काय तुया मनात... सांग माया कानात!
ना रायला स्वाभिमान, येखलाच फिरे अभिमान
उपयली मानुसकी, हारपला रे बावा मानसन्मान!
ईसरुनी सारं गनगोत, जबरदस्तीची रे गयाभेट
जमलं नाई जुगाळं, तं भेटू आता दिल्लीत थेट...!
काई नाई उरलं रे या ‘डावपेची’ आश्वासनात...!
काय तुया मनात, सांग माया कानात...!
भावा माया कायजातल्या कमळफुला...!!
अरुण मोडक
मो. नं.: ९८२२५९३९४७