गोळीबारानंतर दुचाकी सोडून रेल्वेने पळाल्याची माहिती; मुंबई क्राईम ब्रँचकडून तपास सुरू, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या शक्यतेचाही तपास
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला महत्त्वाचे वळण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोटा रेल्वे स्थानकावर सूरत एक्सप्रेसमधून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, कोटा पोलिसांकडून अद्याप या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले होते. त्यानंतर अंधेरी परिसरात दुचाकी सोडून त्यांनी रेल्वेने पुढील प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्याने तपासाच्या दृष्टीने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपासाची गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे उघड करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईबाबत कोटा पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई क्राईम ब्रँचकडे तपासाची जबाबदारी
टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पुढील तपासाची जबाबदारी क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली.
गोळीबारात सहभागी असलेल्या तीन अज्ञात आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे. यापैकी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी त्यांचा या गुन्ह्यातील नेमका सहभाग आणि इतर आरोपींबाबतची माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध आहे का?
या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबतही तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वी या गँगशी संबंधित अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास मुंबई क्राईम ब्रँकने केला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबाराचा या गँगशी काही संबंध आहे का, याचा तपासाच्या अनुषंगाने सखोल शोध घेतला जाणार आहे.
आरोपींची ओळख निश्चित करणे, गोळीबारामागील कारण शोधणे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे, यावर पोलिसांचा भर राहणार आहे. कोटा येथील कारवाईबाबत अधिकृत माहिती आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासातून पुढे येणारे निष्कर्ष याकडे आता लक्ष लागले आहे.