अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
मित्रांनी दूर केलं… एकटेपणाने घेतला जीव; २४ वर्षीय तरुणाची हृदयद्रावक कहाणी
बीड (Youth Depression) अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मित्रांसोबत झालेल्या किरकोळ वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे २४ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. महेश उद्भव असे या तरुणाचे नाव असून, वाढदिवसाच्या कार्यक्रमातून वगळल्याची खंत त्याच्या मनावर खोलवर परिणाम करून गेल्याचे बोलले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास महेश आपल्या घराच्या छतावर गेला होता. तेथे त्याने पिण्याच्या पाण्यात विषारी औषध मिसळून ते प्राशन केले. बराच वेळ उलटूनही तो खाली न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या शोधार्थ कुटुंबीय छतावर गेले असता, महेश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले, त्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेमागे भावनिक कारणे असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी महेशचे मित्रांसोबत वाद झाले होते. त्यानंतर ६ एप्रिल रोजी त्याच्या एका जिवलग मित्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला; परंतु या कार्यक्रमाला महेशला निमंत्रित करण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा कार्यक्रमांच्या नियोजनात तो नेहमी पुढाकार घेत असे. मात्र यावेळी त्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची भावना त्याच्या मनात घर करून बसली होती. या घटनेमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर भावनिक स्टेटस ठेवले होते. “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो,” असे शब्द त्याने लिहिले होते. या स्टेटसमधून त्याच्या मनातील एकटेपणा, नैराश्य आणि भावनिक तणाव स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या या पोस्टकडे गांभीर्याने पाहिले गेले असते, तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती, अशीही चर्चा गावात होत आहे.
महेशच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता, त्याच्या भविष्याबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. त्याच्या इच्छेसाठी वडिलांनी स्वतःची शेती विकून अंबाजोगाई शहरात त्याच्यासाठी कपड्याचे दुकान सुरू करून दिले होते. त्यामुळे महेश कुटुंबाचा आधारस्तंभ बनेल, अशी अपेक्षा होती. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीय पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे कुंबेफळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.