शिंदे गटातील कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
(Vidhan Parishad Election 2026) राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवत सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आगामी विधानपरिषद निवडणुकीतही (Vidhanparishad Election 2026) अशाच धक्कादायक रणनितीचा अवलंब करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर शिंदे गटातील कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना (शिंदे गट) मध्ये हालचालींना वेग आला आहे. १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून, सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांच्यासह अनेक इच्छुक प्रयत्न करत आहेत.
विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला किमान २८ मतांचा कोटा आवश्यक असतो. सध्या विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ ५७ असल्याने दुसरी जागा जिंकण्यात अडचण येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राज्यसभेप्रमाणेच शिंदे अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवतील की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय, पक्षांतर्गत बदलांची शक्यता देखील वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. कामासाठी गेले असता प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे. अलीकडेच धाराशिव आणि सोलापूर येथे शिवसैनिकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर, लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून, अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे कोणते निर्णय घेतात, याकडे राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.