राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. नितीन राऊत यांच्या शोकसंवेदना

नागपूर (Tribute Message) : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाने आपला एक खंबीर आधारवड आणि मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दत्ता मेघे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना डॉ. राऊत म्हणाले की, दत्ताजींचे जाणे ही केवळ राजकीय क्षेत्राची नव्हे, तर माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे राहील. वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान विसरता येणार नाही. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.
डॉ. राऊत यांनी पुढे नमूद केले की, दत्ताजींनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत, तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या हातात शिक्षणाची पाटी दिली. आरोग्य सुविधा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम त्यांनी आयुष्यभर केले. तसेच, दत्ता मेघे यांनी आपल्या कार्यातून केवळ विकासकामेच केली नाहीत, तर अनेक कार्यकर्ते, नेते आणि समाजासाठी झटणारी माणसे घडविली, ही त्यांची मोठी देणगी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही पिढीच आज त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहे.
ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक हरपले-आ. चरणसिंग ठाकूर

भाजपा परिवारातील ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक नेते व राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाची घटना अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकिर्दीत जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवून ते नेहमी कार्यरत राहिले. याच कार्यशैलीमुळे दत्ताजींनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली होती.
तसेच त्यांच्या नेतृत्वात शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा मिळाली होती, अशा भावना आमदार चरणसिंग ठाकूर यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे समाजसेवेतील अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील.
दत्ताजींच्या आत्म्यास सद्गती लाभो. तसेच मेघे कुटुंबीयांना आणि त्यांच्या समर्थकांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
लोकनेता हरपला - महापौर नीता ठाकरे

गेल्या पाच दशकापासून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटविणारे लोकनेते व माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनाने लोकनेता हरपला आहे, अशा शब्दात महापौर नीता ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दत्ता मेघे यांनी अत्यंत कठिण परिस्थितीला सामोरे जात राजकीय क्षेत्रात एक लोकनेता म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी विदर्भासह महाराष्ट्रात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यांनी नेहमीच गरीब व वंचित समाजाचे राजकारण करीत राजकीय क्षेत्रात एक अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण केली.
त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याचे महापौर ठाकरे यांनी शोक संदेशात भावना व्यक्त केल्या आहेत.
बहुजन समाजाचा नेता हरवला - अशोक धवड

दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने बहुजन समाजाचा कनखर व दानशूर नेता हरवला आहे. त्यांच्या निधनाने बहुजन समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शोकसंवेदना माजी आमदार अशोक धवड यांनी व्यक्त केल्या. राजकारण, समाजकारण आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी फार मोठे कार्य केले आहे.
रुग्णालयाच्या माध्यमांतून त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.