महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीकेची झोड उठवत खुल्या चर्चेचे आव्हान दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.
(Political Debate) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीकेची झोड उठवत खुल्या चर्चेचे आव्हान दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे (शिवसेना ठाकरे गट) यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
अंधारे यांनी २०२३ मधील फडणवीस यांच्या ट्विटचा संदर्भ देत ‘ऐतिहासिक क्षण’ असा उल्लेख नेमका कशासाठी होता, असा प्रश्न उपस्थित केला. “आता जर तुम्ही म्हणत असाल की विरोधकांमुळे विधेयक मंजूर झाले नाही, तर त्या ट्विटचा अर्थ काय?” असा थेट सवाल त्यांनी केला.
त्याचबरोबर अमित शाह यांनी २०२३ मध्ये केलेल्या ट्विटचा दाखला देत, लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचे त्यांनी म्हटल्याची आठवण करून दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या त्या काळातील भाषणांचाही उल्लेख करत, “खरं कोण बोलतंय आणि चुकीचं कोण?” हे स्पष्ट होऊ द्या, अशी मागणी अंधारे यांनी केली.
फडणवीस यांनी ‘विधेयकाची भ्रूण हत्या’ असा शब्दप्रयोग केल्याबाबत अंधारे यांनी तीव्र आक्षेप घेतला. “या शब्दाचा अर्थ आणि गांभीर्य समजून घेतले आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, महिला आरक्षणाचा प्रश्न १९५१ पासूनच चर्चेत आहे. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा मुद्दा पुढे आणला होता, मात्र श्यामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा उल्लेख करत, “महिलांसाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?” असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला.
याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकांचे वाचन RSS च्या कार्यक्रमात करणार का, असा प्रश्न उपस्थित करत मोहन भागवत यांच्या भूमिकेबाबतही त्यांनी विचारणा केली.
फडणवीस यांनी विरोधकांना ‘रंग बदलणारा सरडा’ अशी उपमा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्रीपदाला साजेशी भाषा वापरणे अपेक्षित आहे. त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांचा अवमान केल्याचा आरोपही केला. महिलांबाबतचा हा दृष्टिकोन अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, फडणवीस यांच्यात ‘चांगदेवाचा अहंकार’ दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, चर्चेचे आव्हान स्वीकारत अंधारे यांनी स्पष्ट केले की, “वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. चर्चा टाळली तर सत्याला सामोरे जाण्याची भीती असल्याचे दिसून येईल.” त्या स्वतः एकट्याही चर्चेसाठी येण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.