TET Exam Scam: शभरात आणि राज्यात गाजत असलेल्या 'नीट' व 'टीईटी' परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) जिल्हा समितीच्या वतीने तीव्र निदर्शने
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह ११ वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
नांदेड (TET Exam Scam) : देशभरात आणि राज्यात गाजत असलेल्या 'नीट' व 'टीईटी' परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) जिल्हा समितीच्या वतीने सोमवारी (६ जुलै) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
एसएफआय ने निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि स्वप्नांशी हा क्रूर खेळ सुरू आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे परीक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, यामुळे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे बेरोजगार युवक-युवती आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र संताप व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.'नीट' पेपरफुटी प्रकरणाची (TET Exam Scam) नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आणि राज्यातील 'टीईटी' परीक्षा अपयशाची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे, सध्या सुरू असलेली ११ वी क्लिष्ट 'ऑनलाईन' प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद करून ग्रामीण व सर्वसामान्य भागातील विद्यार्थ्यांना सोयीची ठरेल अशी पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन' प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.
'टीईटी' घोटाळ्याची (TET Exam Scam) निष्पक्ष आणि उच्चस्तरीय (सीबीआय) चौकशी करून मुख्य सूत्रधारांना व दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी. तसेच भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी दोषींना आजन्म कारावास आणि कडक दंडाची तरतूद असणारा विशेष कडक कायदा लागू करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काचे (फी) अधिकृत बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे, विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त व बेकायदेशीर शैक्षणिक शुल्क (डोनेशन/जादा फी) आकारणाऱ्या शाळा व कॉलेज प्रशासनावर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, नांदेड शहरातील शासकीय आयटीआय येथील मुलांचे वसतिगृह गेल्या ८ वर्षांपासून बंद आहे. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने या वसतिगृहाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
सदरिल मागण्यांवर प्रशासन आणि सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण जिल्ह्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा 'सएफआय' जिल्हा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात विजय लोहबंदे,मिना आरसे,पवन जगडमवार,स्वप्निल बुकतरे,विनोंद गोंविदवार, डाॅ.सचिन खडके,गजानन इंगोले, विकास गायकवाड,साहेबराव सोनसळे,अमोल गायकवाड,शरद कंधारे,वैभव वाघमारे,स्वाती हाटकर,महेंद्र बनसोडे,किशोर लोहबंदे,प्रतिक मुजळगेकर,जय गायकवाड,प्रथम तारू यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.