MLA Sanjay Gaikwad: अमरावती विभागातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुनर्रचनेत मोताळा तालुक्याचा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या प्रस्ताव
बुलढाण्यापासून कधीच वेगळा होऊ देणार नसल्याची ग्वाही!
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट; पुनर्रचना प्रस्तावात बदलाची ठाम मागणी
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : अमरावती विभागातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुनर्रचनेत मोताळा तालुक्याचा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या प्रस्तावाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी तीव्र विरोध दर्शवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मोताळा तालुका बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची त्यांनी ठाम मागणी केली.
आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी निवेदनात नमूद केले की, मोताळा तालुक्याची भौगोलिक रचना, नागरिकांची सोय आणि प्रशासकीय सुलभता लक्षात घेता हा तालुका बुलढाण्याशीच जोडून ठेवणे जनहिताचे आहे. मोताळा ते बुलढाणा हे अंतर अवघे २० किलोमीटर असून, मोताळा ते खामगाव सुमारे ७० किलोमीटर आहे. त्यामुळे खामगावशी जोडल्यास नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागेल. यापूर्वीही मोताळा तालुका बुलढाणा उपविभागीय कार्यालयाशीच कायम ठेवण्याची मागणी सातत्याने होत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच मलकापूर उपविभागातून मोताळा तालुका वगळून तो बुलढाणा उपविभागीय कार्यालय तसेच प्रस्तावित बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा आणि पुनर्रचनेबाबत जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये आवश्यक अंशतः बदल करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सादर केलेल्या निवेदनाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित महसूल विभाग आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना विषयाची तातडीने पडताळणी करून जनहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच पुनर्रचना सर्क्युलरमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले की, मोताळा तालुका हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. मोताळा आणि बुलढाण्याचे नाते हे केवळ प्रशासकीय नाही, तर विकास, संस्कृती आणि जनभावनांशी जोडलेले आहे. त्यामुळे मोताळा तालुका बुलढाण्यापासून कधीच वेगळा होऊ देणार नाही. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष कायम सुरू राहील.