TET Paper Leak Protest: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी 'डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया' (डीवायएफआय) संघटन
शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेण्याची मागणी
नांदेड (TET Paper Leak Protest) : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी 'डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया' (डीवायएफआय) संघटनेच्या वतीने २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. २८ जून रोजी होवू घातलेली टिईटी परीक्षा २७ जून रोजीच पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात नुकतेच गाजलेले 'नीट' परीक्षा घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता महाराष्ट्रातही 'महा टीईटी'चा पेपर फुटल्याने (TET Paper Leak Protest) राज्यातील लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महिनोनमहिने कठोर परिश्रम, आर्थिक खर्च आणि मानसिक तयारी करून परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा थेट खेळ खेळला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शासनाकडून वारंवार कडक कायदे आणि उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात पेपरफुटीचे प्रकार रोखण्यात सरकारला सातत्याने अपयश येत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला असून तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या (TET Paper Leak Protest) गंभीर घटनेची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. यासोबतच, या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करून यामागील संपूर्ण टोळी उघडकीस आणण्यात यावी.

गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, बेरोजगार तरुण व विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीची दखल घेऊन शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी अत्याधुनिक, सुरक्षित, भ्रष्टाचारमुक्त आणि पूर्णपणे पारदर्शक परीक्षा व्यवस्था तातडीने लागू करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.सरकारने याची दखल घेवून तातडीने राजीना घ्यावा अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या निवास्थावर मोर्चा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
या (TET Paper Leak Protest) संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डीवायएफआयच्या वतीने देण्यात आला असून आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष स्टॅलिन आडे, जिल्हा सचिव इरफान पठाण, जिल्हा समिती सदस्य श्याम सरोदे, जय गायकवाड, जेतालाल राठोड, सुभाष गजभारे, प्रेमला पतंगे, करवंदा गायकवाड, अंबादास भंडारे, दिगंबर घायाळे, एस.एफ.आय.चे राज्य समिती सदस्य कॉ. पवन जगडवार, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रफुल कऊटकर, नेहा कऊटकर, आडेलू बोनगीर, सुनीता बोनगीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.