Latur Election: लातूर-धाराशिव-बीड सत्ताधारक मतदानात भाजपाचा उमेदवारी बसवराज पाटीलने विजय मिळवला. त्याने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार महेश देशमुख
महाराष्ट्रातून विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी!
महादेव कुंभार
लातूर (Latur Election) : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील महाराष्ट्रातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. बसवराज पाटील यांना 844 तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना केवळ 125 मते मिळाली. या निवडणुकीत 14 मते अवैध ठरली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केवळ 125 मते मिळाल्याने महाविकास आघाडीत मोठी बेइमानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूर धाराशिव (Latur Election) बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांना सुरुवातीपासूनच मताधिक्य मिळेल, याची खात्री होती. या मतदारसंघात भाजपा महायुतीचे मतदार सर्वाधिक आहेत. या मतांच्या जोरावर भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील याची खात्री होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बसवराज पाटील यांनी लातूरसह धाराशिव आणि बीड या तिन्ही जिल्ह्यात भाजपाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व नेते आणि मतदार यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
प्रचारात सुरुवातीपासूनच बसवराज पाटील यांच्यासोबत भाजपा महायुतीचे सर्व आमदार लोकप्रतिनिधी ताकदीने उभे होते. दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे नवखे उमेदवार महेश देशमुख यांच्या प्रचाराचा धुमधडाका म्हणावा तसा दिसून आला नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत महेश देशमुख यांना लातूरच्या देशमुख यांनी प्रचाराची सुरुवात करून दिली आणि पुन्हा कोणीही त्यांच्यासाठी मैदानात उतरले नसल्याने ही निवडणूक अगदीच एकतर्फी होणार, अशी चर्चा कायमच राहिली, आणि ते अखेर सत्य ठरले.
महेश देशमुख यांच्यासाठी काँग्रेसचे केवळ बोटावर मोजण्या एवढे पदाधिकारी प्रचारासाठी फिरले. विशेष म्हणजे देशमुख हे काँग्रेसच्या मतदारांपर्यंत ही पोहोचू शकले नाहीत, याचे उदाहरण (Latur Election) लातूर महापालिकेत काही सदस्यांनी बसवराज पाटील यांच्या पारड्यात टाकलेल्या मतदानाच्या वजनावरून लक्षात येते. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात तसेच बीड व धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतदारापर्यंत काँग्रेसचे उमेदवार पोहोचू न शकल्याचा बरोबर लाभ राजकारणातील मुरब्बी असलेले भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांनी घेतला. भाजपा महायुतीच्या मतदारांसोबतच त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतदारांशी संपर्क साधत त्यांचे मतदान आपल्याकडे वळविण्याचा करिष्मा सिद्ध केला. आगामी राजकारणाच्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांना हा एक मोठा हादरा मानला जात आहे.
सोमवारी झालेल्या धाराशिव येथे झालेल्या मतमोजणीत 983 मतदानापैकी 14 मते अवैध ठरली. 969 मते वैध ठरली. त्यात बसवराज पाटील यांना 844 तर काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना 125 मते मिळाली. दरम्यान विजयानंतर बसवराज पाटील मुरूमकर यांचा भाजपा नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला.
मतदारांनी मोठा विश्वास टाकला, तो सिद्ध करण्याची जबाबदारी वाढली
विधान परिषदेच्या लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजयानंतर बसवराज पाटील दैनिक 'देशोन्नती'शी बोलताना म्हणाले की, या तिन्ही जिल्ह्यातील मतदारांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला, तो सिद्ध करण्याची जबाबदारी या विषयामुळे वाढली आहे. आपण सर्वांना एकत्र घेऊन आगामी काळात या तिन्ही जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने, अहोरात्र परिश्रम घेऊ. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या तिन्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आगामी काळात पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असेही बसवराज पाटील म्हणाले.