Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली.
मुंबई (Vijay Wadettiwar) : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना 'आभाळातून ज्ञान' प्राप्त झाल्याचा टोला लगावला.
या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सर्वाधिक आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यावर घेतली. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांना पुस्तकातून नाही, तर थेट आभाळातून ज्ञान आले आहे. जर त्यांच्याकडे पुस्तकी ज्ञान असते, तर ते कायद्याच्या भाषेत बोलले असते. आभाळातून ज्ञान आल्यामुळेच ते कोणत्याही भाषेत बोलतात आणि धमक्या देतात. केवळ समाजाची आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सर्व चालले आहे. या पोरांच्या आयुष्याशी खेळणे आता थांबवले पाहिजे.”
ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले की, “ओबीसींना संविधानातून आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे पुरावे आवश्यकच आहेत. जर पुरावे नसतील, तर कुणालाही कुठलेही प्रमाणपत्र देता येत नाही, हे साधे गणित आहे. जर जरांगे पाटील हे साधे गणित मानायला तयार असतील, तर सरकारचे मंत्री पुन्हा त्यांना भेटायला जातील.” शेवटी सरकारला टोला लगावताना ते म्हणाले, जरांगे पाटील यांना दाढी नाही, पण तरीही काही मंत्री जाऊन त्यांची दाढी कुरवाळतील.
भाजप-शिवसेनेत शीतयुद्ध सुरू
राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील विसंवादावर बोलताना वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, "सध्या राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रचंड प्रमाणात शीतयुद्ध सुरू आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच 'भाजपने आमची मुंडकी छाटली' असे वक्तव्य केले होते. यावरूनच हे स्पष्ट होते की ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत."