Pandharpur Vitthal Wari: आषाढी काळी, पंढरपूरचा पवित्र वास मांडून चंद्रभागे स्नान करत विठ्ठलांचा दरशना होणारे यात्रा धार्मिक जगातील सर्वोच्च गौरव आहे. २४ युगांत भेटीची परंपरा असलेल्या पंढरपूर
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आतूरलेला प्रत्येक जीव हा शिव असतो. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी, भेटीसाठी हा जीव नित्य नियमाने जातो, त्या नियमाला वारी असे म्हणतात आणि नियम अंगिकारणाऱ्याला वारकरी असे म्हणतात.
अशा पंढरपूर आणि विठ्ठलाचे महात्म्य अगाध आहे. ते यासाठी की, हा देव भक्तीचा भुकेला आहे. (Pandharpur Vitthal Wari) आपल्या लाडक्या भक्त पुंडलिकासाठी तो पंढरीत आला आणि आई-वडिलांच्या सेवेत व्यस्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तो पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभा आहे... एक-दोन दिवस, महिने, वर्षे, तपे, शतके, युगे नव्हे, तर तब्बल अठ्ठावीस युगे. अशा अठ्ठावीस युगात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला या विठ्ठलाला वारंवार भेटण्याची आस कायम आहे, म्हणून या भेटीच्या सोहळ्याला वारी असे म्हटले जाते. हा जगातील सर्वात मोठा पायी यात्रा सोहळा मानला जातो.
वारी (Pandharpur Vitthal Wari) ही अनंत काळापासून चालत आलेली परंपरा आहे. जो भक्त नित्य नियमाने पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि दर्शनासाठी वारंवार जातो, त्याला वारी असे म्हटले जाते आणि त्या भक्ताला वारकरी असे म्हटले जाते. 'भेटीलागीं जीवा, लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी,' अशी विठ्ठल दर्शनाची ओढ संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका विराणी मध्ये वर्णिलेली आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी लागलेली तीव्र ओढ आणि तळमळ अत्यंत सुंदर शब्दांत मांडली तुकाराम महाराजांना मांडली आहे. विठ्ठलभक्ताला दर्शनाची ओढ लागणे, ती वारंवार लागणे आणि त्यासाठी तो भक्त वारंवार पंढरीत येणे यालाच वारी असे म्हटले जाते.
चकोर पक्षी आणि चंद्र यांच्यातील नाते हे अनन्यसाधारण, अतूट आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. चंद्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि केवळ चंद्रकिरणांवर जगणारा पक्षी म्हणून चकोराची ओळख मानली जाते, तद्वतच विठ्ठल आणि त्याच्या भक्ताची तुलना संत तुकाराम महाराजांनी केली आहे. हे करताना त्यांनी अंतरीची तळमळत या अभंगात वर्णित केली आहे. 'भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची'अर्थात भूक लागलेले बाळ अती रडत आईची वाट पाहते, अशी अवस्था भक्ताची होणे... ही भूक केवळ श्रीमुख पाहण्याची, दर्शनाची होय. हा भाव व्यक्त करणारा सोहळा म्हणजेच आषाढी यात्रा सोहळा होय. म्हणूनच 'आषाढी कार्तिकी भक्तजण येती, दिंड्या पताका वैष्णव नाचती,'असा महिमा या सोहळ्याचा वर्णिला गेला आहे.
वारी (Pandharpur Vitthal Wari) म्हणजे केवळ पंढरपुरात येणे नव्हे, तर वारी म्हणजे 'पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शना विठोबाचे'. पंढरपुरात राहणे, चंद्रभागा नदीत स्नान करणे आणि विठ्ठलाचे दर्शन घेणे.' वारकऱ्याच्या दृष्टीने या तीन गोष्टींमध्येच जगातले सर्वोच्च सुख सामावलेले आहे. पंढरपूर या भौगोलिक ठिकाणी राहणे, असे नव्हे तर संतांच्या आणि भक्तांच्या सानिध्यात राहून सात्विक व ईश्वराभिमुख जीवन जगणे होय. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात आंघोळ केल्याने शरीराचे बाह्य स्नान होते, तसेच या भक्तीमुळे मनातील वासना, अहंकार आणि पापांचे क्षालन होऊन अंतःकरण शुद्ध होते, असा याचा अर्थ आहे. आणिक विठोबाचे दर्शन याचा अर्थ केवळ मूर्ती पाहणे असा नाही, तर बाह्य विठ्ठलाच्या रूपाचे ध्यान करत करत स्वतःमधीलच आत्म्याला (विठ्ठलाला) ओळखणे म्हणजेच ईश्वर साक्षात्कार होय. जन्म जन्मांतरी हे तीन लाभ मिळू दे, यासाठीचे मागणे करणाऱ्या म्हणजे वारकरी!
पंढरीची आषाढी वारी (Pandharpur Vitthal Wari) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा.'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. 'भेदाभेद अमंगळ' या सदाचरणाने या वारीत सहभागी होणारा तो वारकरी होय.
विठ्ठलाच्या पंढरपुरातील अठ्ठावीस युगाच्या परंपरेपासून भक्ताची वारी सुरू आहे. भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरपुरात आला, असे म्हटले जाते. मात्र विठ्ठलाच्या भेटीसाठी भक्त पंढरपुरात आला, याला वारी असे म्हटले जाते. पुंडलिक काळानंतरची वारी आणि बाराव्या शतकात या वारीला जोडला गेलेला पादुका दिंडी पालखी सोहळा हा आषाढी वारीचा अमृतकलश मानला गेला आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा विद्यमान सरकारच्या काळातच नाही तर त्यापूर्वीही राजे-राजवाडे तसेच इंग्रज सरकार काळात सुद्धा या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला सातत्याने सहाय्य होत गेले. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार यात्रा पंढरपुरात होतात. मात्र यापैकी आषाढ वारी ही सर्वात मोठी यात्रा होय.
चांगले आचरण करणाऱ्याला रोखू नका!
'तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥' असे संत तुकाराम महाराजांनी एका अभंग म्हटले आहे. जर कोणी व्यक्ती तप, तीर्थयात्रा, दान, व्रत आणि चांगले आचरण करत असेल, तर त्यांना त्यापासून कधीही परावृत्त (थांबवू) करू नका. कारण अशा सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या उद्धारासाठी कोट्यवधी कुळे वाट पाहत असतात. जर कोणी चांगले आचरण करणाऱ्याला रोखू नका! असा या अभंगाचा अर्थ.
साधा आणि उघड परमार्थ
सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ या वारीतून घडावा, असा उद्देश ठेवून यात्रा केली जाते. सध्या या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या, पालख्या येतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. या दिवसापासून देवाची निद्रा सुरू होते, असे मानले जाते.
भक्त पुंडलिकापासून...
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे." ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते.
-महादेव कुंभार
आवृत्ती प्रमुख, दैनिक देशोन्नती, लातूर