महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
केंद्रात सक्षम मंत्रिमंडळ उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फडणवीसांना केंद्रात घेण्याबाबत चर्चा करत असल्याचा राऊतांचा दावा
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री लवकरच केंद्राच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात, असा दावा उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात अधिक सक्षम मंत्रिमंडळ उभारायचे असून त्यासाठी फडणवीस यांची दिल्लीत आवश्यकता असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत भाष्य केले. पंतप्रधान मोदी आपल्या सहकाऱ्यांशी फडणवीसांना केंद्रात आणण्याबाबत चर्चा करत असल्याचा दावा त्यांनी केला. कालही फडणवीसांना यासंदर्भात काही सांगण्यात आले असावे, असे राऊत म्हणाले.
फडणवीस सध्या महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने आवरून दिल्लीकडे रवाना होतील, असा अंदाजही राऊत यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याची शक्यता नाकारली असल्याबाबत विचारले असता, महाराष्ट्रातून यापूर्वी अनेक नेते केंद्राच्या राजकारणात गेल्याचे त्यांनी नमूद केले. अशा वेळी राज्यातील राजकीय समीकरणे आणि जबाबदाऱ्यांची योग्य मांडणी करावी लागते, असेही राऊत म्हणाले.
‘फडणवीसांना दिल्लीची गरज नाही, दिल्लीला त्यांची गरज आहे’, असे म्हणत राऊत यांनी या संभाव्य राजकीय बदलावर आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, केंद्रातील मंत्रिमंडळाच्या कार्यपद्धतीवरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी यांना अधिक प्रभावी आणि सक्षम मंत्रिमंडळ तयार करायचे असल्याने फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्याची केंद्रात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा व्यक्त करत असले, तरी राजकीय वर्तुळात त्यांना दिल्लीला जाण्याची प्रतीक्षा करणारे अनेक जण असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
राऊत यांनी यावेळी फडणवीसांच्या जुन्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाचाही संदर्भ घेतला. सत्ता परिवर्तनासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असा आरोप त्यांनी केला.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मंत्रिमंडळात बदल अथवा फेरबदल करण्यासाठी फार मोठा कालावधी लागत नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.