Krantikari Farmer Organization: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गजानन कावरखे यांना हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार
उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी काढले आदेश
हिंगोली (Krantikari Farmer Organization) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गजानन कावरखे यांना हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश २ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुडे यांनी काढले आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी चळवळीत खळबळ उडाली आहे.
गजानन कावरखे यांना हद्दपारीची नोटीस मिळाल्यानंतर (Krantikari Farmer Organization) क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी हिंगोली येथील शासकीय निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यावेळी तुपकर यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणार्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आगामी काळातील निवडणुकांमध्ये शेतकरी चळवळीमुळे राजकीय भीती निर्माण झाल्यानेच कावरखे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला होता.
गजानन कावरखे हे हिंगोली जिल्ह्यात शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी मोर्चे, रास्ता रोको, आंदोलनांसह अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. शेतकर्यांचे कर्जमाफी, पीकविमा, कृषी निविष्ठा, शेतमालाला योग्य भाव यांसह विविध प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे (Krantikari Farmer Organization) संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक म्हणूनही गजानन कावरखे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीच्या कारवाईनंतर संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘शेतकर्यांच्या हक्कासाठी आवाज उठविणार्या कार्यकर्त्यांना हद्दपार करून शेतकर्यांचा आवाज दाबता येणार नाही,’ अशी भूमिका संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून, या कारवाईविरोधात आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिले आहेत.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे (Krantikari Farmer Organization) मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे हे गोरेगाव येथील रहिवासी असून त्यांनी शेतकर्याच्या अनेक प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनामुळे गोरेगाव, नर्सी नामदेव, सेनगाव व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात १४ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सदर सर्व गुन्हे न्याय प्रविष्ट असून कोणत्याही गुन्ह्यात त्यांना अद्यापपर्यंत शिक्षा झाली नाही. हे सर्व गुन्हे राजकीय द्वेषापुर्वी दाखल केलेले असल्याचा जबाब कावरखे यांनी सुनावणी दरम्यान दिला होता.