देशाचा झेंडा विणणाऱ्या हातांना मात्र उपेक्षेची गाठ
३३.३० रुपये मीटर मजुरी, जीर्ण इमारत अन् पेन्शनची आस
हणमंत केंद्रे
उदगीर (Udgir Tiranga Artisan) : दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी अभिमानाने फडकणाऱ्या तिरंग्यामागे उदगीरच्या खादी कारागिरांच्या कष्टाचे, घामाचे आणि देशाभिमानाचे धागे विणलेले आहेत. मात्र देशाच्या सन्मानाचा झेंडा विणणाऱ्या या हातांच्या वाट्याला आजही सन्मानजनक मोबदला आणि सुरक्षित भविष्य आलेले नाही. उदगीरच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वजासाठी लागणाऱ्या खादीच्या कापडाची निर्मिती होते. तुटपुंज्या मजुरीवरही हे कारागीर देशप्रेमाचा आणि देशाभिमानाचा धागा विणत आहेत.
देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्यापासून गावातील ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत तिरंगा डौलाने फडकतो. देशभर त्याला सलाम केला जाणार्या त्या तिरंग्याचा धागा (Udgir Tiranga Artisan) उदगीरच्या हातांनी विणलेला आहे. या हातांना सलाम करण्याची गरज आहे.
देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीत (Udgir Tiranga Artisan) उदगीरच्या खादी ग्रामोद्योग केंद्राचा मोठा वाटा आहे. ग्रामपंचायतीपासून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत फडकणाऱ्या तिरंग्याच्या कापडाच्या निर्मितीत उदगीरच्या कारागिरांचा घाम गळालेला आहे. देशाचा मान उंचावणाऱ्या या हातांच्या वाट्याला मात्र आजही तुटपुंजी मजुरी आणि भविष्याची चिंता आहे.गांधीजींच्या चरख्यावरून सुरू झालेली सूत कताईची परंपरा उदगीरमध्ये आजही जिवंत आहे. हाडोळती, अहमदपूर, किनगाव आणि जळकोट येथील उपकेंद्रांवर सूत कताई केली जाते. उदगीर केंद्रात सूत वळण्यापासून कापड विणण्यापर्यंतची प्रक्रिया पार पडते. त्यानंतर नांदेड येथील मुख्य कार्यालयात शिलाई, रंगाई, प्रमाणबद्ध राष्ट्रध्वज निर्मिती आणि अशोकचक्राची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
म्हणजेच तिरंगा तयार होण्याच्या प्रत्येक टप्प्यामागे (Udgir Tiranga Artisan) उदगीरच्या खादी कारागिरांच्या श्रमाचा मोठा वाटा आहे. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना उदगीरच्या कारागिरांच्या हाताची आठवण होते. यांच्या हाताचा गौरव होतो. तिरंग्याला सलाम करण्याबरोबरच तिरंगा विणणाऱ्या हातांनाही सलाम करण्याची हीच खरी प्रजासत्ताक दिनाची वेळ आहे.
३३.३० रुपयांत देशाचा ध्वज; संसाराचा गाडा कसा?
राष्ट्रध्वजासाठी कापड विणणाऱ्या कारागिरांना अवघी ३३.३० रुपये प्रतिमीटर मजुरी मिळते. १,००० मीटरची दोरा गुंडी तयार करण्यासाठी केवळ १५ रुपये, तर १२० मीटर कापड असलेल्या एका बिमसाठी २१८.४० रुपये मजुरी मिळते. महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंज्या मजुरीवर संसाराचा गाडा ओढायचा कसा, हा प्रश्न कारागिरांसमोर आहे. ज्या हातांनी देशाचा झेंडा विणला, त्याच हातांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे.
खादी ग्रामोद्योगाची इमारतच मोडकळीस!
देशाच्या राष्ट्रध्वजासाठी कापड तयार करणाऱ्या उदगीरच्या खादी ग्रामोद्योग केंद्राची अवस्था पाहिली तर आणखी एक धक्कादायक वास्तव समोर येते. वर्षानुवर्षे जुनी असलेली ही इमारत आता जीर्ण होऊन अनेक ठिकाणी मोडकळीस आली आहे. बांधकाम जुने, छत, पत्रे, दरवाजे आणि खिडक्या खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी इमारतीचे भाग पडल्याची स्थिती आहे. अशा धोकादायक वातावरणात कारागीर आपले काम सुरू ठेवत आहेत.
देशाचा तिरंगा मजबूत राहावा म्हणून धागा मजबूत करणाऱ्या कारागिरांचे काम मात्र जीर्ण इमारतीत! हा विरोधाभास प्रशासनाच्या डोळ्यात कधी भरणार?
कारागिरांच्या श्रमावर देशाचा अभिमान उभा राहतो; मग त्या कारागिरांना सुरक्षित कार्यस्थळ देणे ही शासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
५८ वर्षे तिरंगा विणला; आता पेन्शनची आस!
तब्बल ५८ वर्षे राष्ट्रध्वज निर्मितीचे काम केले.सुरुवातीला ५० पैशे मजुरी होती. आयुष्यभर राष्ट्रध्वज बनविला. आता हात-पाय थकले आहेत. दुसरे उपजीविकेचे साधन नाही.योग्य मजुरी, सुरक्षित कार्यस्थळ, जीर्ण इमारतीची तातडीने दुरुस्ती आणि प्रदीर्घ सेवा देणाऱ्या कारागिरांना पेन्शन या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. शासनाने आम्हाला पेन्शन द्यावे, अशी मागणी महिला कारागिरांनी केली आहे.
‘सरकारने खादीला सरकारी बाजार द्यावा!’
“सदया खादीची विक्री कमी झाली आहे.त्यामूळे शासिनाने खादीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना खादीचा गणवेश सक्तीचा करावा. आठवड्यातून किमान दोन दिवस तरी खादीचा वापर करण्याची सक्ती करावी.सक्ती केल्यास विक्री वाढेल, उत्पादनाला चालना मिळेल आणि कारागिरांना रोजगार मिळेल.”
-शेख अकबर शेख अहमद, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग केंद्र, उदगीर