राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड घडली आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड; ४२७ संस्थांच्या सभासदत्वाची चौकशी आदेशित, राजकारण तापले
कोल्हापूर (Gokul Milk Union) : राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड घडली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या मतदार यादीतील काही संस्थांच्या सभासदत्वाबाबत आक्षेप घेतल्यानंतर विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (पुणे विभाग) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
माहितीनुसार, गोकुळच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या एकूण ११०८ संस्थांपैकी ४२७ संस्थांच्या नोंदणी व सभासदत्व प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता. वडकशिवाळे येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी या संस्थांना सभासद करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून प्राथमिक पडताळणी झाल्यानंतर आता अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी ही चौकशी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा केला आहे. “अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व प्रक्रिया नियमांनुसारच पार पडली आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
मात्र, पंचवार्षिक निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना चौकशीचे आदेश आल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोकुळच्या सत्तेसाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची ‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’ सध्या सत्तेत असून, त्यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या आघाडीतील काही घटक पक्ष महायुतीत असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
दरम्यान, भाजपकडूनही या निवडणुकीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “गोकुळचे राजकारण भाजपला वगळून होऊ शकत नाही. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीबाबत निर्णय घेऊ,” असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्यांच्या या भूमिकेतून सतेज पाटील यांच्यासह महायुतीतील काही नेत्यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तसेच, या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील स्थानिक गट, शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यात चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळ दूध संघ हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी सहकारी संस्थांपैकी एक मानला जात असल्याने या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
मतदार यादीतील संस्थांच्या चौकशीमुळे गोकुळ निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार बनले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.