Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > महाराष्ट्र

प्रोजेक्ट

जंगलातून परतलेल्या पन्नास माओवाद्यांची घर वापसी

संजीवनी


जंगलातून परतलेल्या पन्नास माओवाद्यांची घर वापसी

*मुख्य प्रवाहात परतलेल्या ५० माजी माओवाद्यांची मूळ जिल्ह्यांकडे रवानगी* 
गडचिरोली पोलिसांचा निरोप समारंभ; आतापर्यंत ८१९ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
‘5 संजीवनी’तून पुनर्वसनाचा हात; ८८ जणांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगार
गडचिरोली : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी (दि. ३१) त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. यानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांना आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रे, कौशल्य प्रशिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत उपलब्ध करून देण्यात आली.
गडचिरोली पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील माओवादी कारवायांविरोधात राबविण्यात आलेल्या अभियानांसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांच्या अभिलेखानुसार जिल्ह्यात आता एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलीस दलाने केला आहे.
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून नव्या आयुष्याची सुरुवात
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे केवळ प्रशासकीय पुनर्वसन न करता त्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून ‘प्रोजेक्ट संजीवनी’ राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत आत्मसमर्पित सदस्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया तसेच मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात आले. सामाजिक समावेशन आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी ध्यान व योग शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.
४६ जोडप्यांचे विवाह; ८८ जणांना रोजगार
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आतापर्यंत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहेत. तसेच ८८ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणासह रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या ५० आत्मसमर्पित सदस्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आले. यावेळी संबंधित सदस्यांनीही मनोगत व्यक्त करीत पुनर्वसनाच्या काळात पोलीस दलाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
‘आता आत्मनिर्भर होऊन सन्मानाने जगा’
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना मार्गदर्शन करताना, हिंसाचाराचे जीवन मागे सोडल्यानंतर मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन केले. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

Related to this topic: