पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून महानगरांमध्ये मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली (Fuel Saving) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून महानगरांमध्ये मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असे आवाहन केले आहे. या आवाहनाचा प्रभाव आता केंद्र सरकारमधील मंत्र्यांवरही दिसून येत असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि नितीन गडकरी यांनी त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय आयुष मंत्री आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्लीतील आपल्या निवासस्थानापासून विमानतळापर्यंतचा प्रवास मेट्रोने केला. त्यांनी शिवाजी स्टेडियम ते आयजीआय टर्मिनल ३ असा मेट्रो प्रवास करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः तिकीट काढून मेट्रोच्या प्रवेशद्वारावर ते स्कॅन केल्याचेही दिसून आले. त्यांच्या सोबत ताफ्यातील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक देखील मेट्रोनेच प्रवास करत होते.
पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर जाधव यांनी त्यांच्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शक्य तितक्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही इंधन बचतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ते १४ आणि १५ मे २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार असून, या दौऱ्यात ते एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ बसने प्रवास करणार असल्याची माहिती आहे.
या संदर्भात गडकरी यांनी पुणे प्रशासनालाही आवश्यक त्या सूचना दिल्या असून, पाहणीदरम्यान सुरक्षा रक्षकांसह बसनेच प्रवास केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्र्यांकडून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, यामुळे इंधन बचतीसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.