Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > महाराष्ट्र

Farmer Loan Waiver

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा; पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला.


फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा पहिल्या टप्प्यात 622 लाख शेतकऱ्यांना लाभ

Farmer Loan Waiver |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निधी वर्ग; कर्जमाफीची प्रक्रिया दोन टप्प्यांत, 18 ते 19 लाख खात्यांवर प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 5,029 कोटी रुपयांचा निधी 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. योजनेची पहिली यादी आषाढी एकादशीच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. ही यादी संबंधित ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी केवळ आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक क्रमांक आणि आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून खात्यांची पडताळणी करून कर्जखाती नील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 6 लाख 22 हजार 207 खात्यांमध्ये शासनाकडून निधी जमा झाला असून, संबंधित कर्जखाती नील झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, काही शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर दिसणारी रक्कम आणि शासनाकडून मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम यामध्ये तफावत असल्याचा गैरसमज झाला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस यांनी सांगितले की, एनपीए खात्यांवर आकारले जाणारे व्याज कर्जाची रक्कम अधिक असल्याचे दर्शवत होते. बँकांनी हे व्याज रद्द केल्यानंतर कर्जखात्यातील प्रत्यक्ष रक्कम आणि शासनाने जमा केलेली कर्जमाफीची रक्कम समान झाली आहे. त्यामुळे संबंधित खाती नील करण्यात आली आहेत.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या खात्यांची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सध्या जवळपास 18 ते 19 लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे 12 लाख खाती बँकांकडे परत पाठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये बँकांकडून काही त्रुटी आढळल्याने दुरुस्ती करून ती खाती पुन्हा पाठवण्यास बँकांनी साधारण आठवडाभराचा कालावधी लागेल, अशी माहिती दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठीची रक्कम जमा केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

दररोज मोठ्या संख्येने पात्र खाती प्रक्रियेसाठी प्राप्त होत असून, आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर संबंधित खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: