e-Praman Portal: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या महिनाभरात बँकांना हे पोर्टल उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनी गृहकर्जासाठी अर्ज
मालमत्तेच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी शक्य; फसवणुकीला बसणार आळा
पुणे (e-Praman Portal) : नागरिकांना नोंदणीकृत दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या उपलब्ध करून देणाऱ्या ‘ई-प्रमाण’ पोर्टलचा (e-Praman Portal) विस्तार आता बँकांपर्यंत करण्यात येणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या महिनाभरात बँकांना हे पोर्टल उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे नागरिकांनी गृहकर्जासाठी अर्ज केल्यानंतर सादर केलेला दस्तऐवज खरा आणि अधिकृत आहे की नाही, याची पडताळणी बँकांना ऑनलाइन करता येणार आहे. परिणामी बँकांना कर्ज मंजूर व वितरित करताना सुविधा होईल, तर नागरिकांनाही विनाविलंब कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांना नोंदणीकृत दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या मिळाव्यात यासाठी राज्यात ‘ई-प्रमाण’ प्रणाली (e-Praman Portal) लागू केली आहे. आता या प्रणालीचा वापर बँकांनाही करता येणार आहे. या पोर्टलमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने संबंधित दस्तऐवजाची माहिती सुरक्षित पद्धतीने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकाच मालमत्तेवर वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेण्यासारख्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
बँकांची फसवणूक रोखण्यास मदत
दस्तऐवजाशी संबंधित प्रत्येक व्यवहार आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीचा इतिहास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन केला जाणार आहे. त्यामुळे दस्तऐवजात छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची नोंद उपलब्ध राहणार आहे. तसेच, एखाद्या मालमत्तेवर आधीच कर्ज घेतलेले असताना त्याच मालमत्तेवर दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहितीही प्रणालीद्वारे समोर येण्यास मदत होईल. त्यामुळे बँकांची फसवणूक रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रत्येक पानावर डिजिटल स्वाक्षरी
‘ई-प्रमाण’द्वारे (e-Praman Portal) उपलब्ध होणाऱ्या दस्तऐवजाच्या प्रत्येक पानावर दुय्यम निबंधकाची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. त्यामुळे दस्तऐवजातील पाने बदलणे किंवा त्यात फेरफार करणे कठीण होणार आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेले दस्तऐवज नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पोर्टलवर सुरक्षित ठेवले जात आहेत. केवळ दस्तऐवज क्रमांकाच्या आधारे बँकांना त्याची पडताळणी करता येणार आहे.
सरकारी कामांसाठीही डिजिटल प्रत वापरता येणार
‘ई-प्रमाण’मधून (e-Praman Portal) मिळणारी डिजिटल प्रत अन्य सरकारी कामांसाठीही वापरता येणार आहे. नागरिकांना घरबसल्या प्रमाणित दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता त्याचा विस्तार बँकिंग क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.