CNG-PNG Biogas: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (E20) मिश्रण लागू केल्यानंतर केंद्र सरकारने आता CNG आणि PNG मध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) मिसळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्राचा ₹23,731 कोटींचा 'गोवर्धन' प्रकल्प; वाहनांवर काय परिणाम?
नवी दिल्ली/ मुंबई (CNG-PNG Biogas) : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (E20) मिश्रण लागू केल्यानंतर केंद्र सरकारने आता CNG आणि PNG मध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) मिसळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी ₹23,731 कोटींच्या 'गोवर्धन' (GOBARdhan) प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील दहा वर्षांत देशातील बायो-सीएनजी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सरकारचा हा (CNG-PNG Biogas) उपक्रम 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवण्यात येणार असून, स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन सुधारणे आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
CNG वाहनांवर होणार का परिणाम?
पेट्रोलमध्ये E20 मिश्रण लागू झाल्यानंतर काही वाहनचालकांनी कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता CNG मध्ये बायोगॅस मिसळल्यावर वाहनांवर परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बायो-सीएनजी हा जनावरांचे शेण, कृषी अवशेष, ओला कचरा आणि सेंद्रिय पदार्थांपासून तयार केला जातो. शुद्धीकरणानंतर त्याची गुणवत्ता नैसर्गिक CNG प्रमाणेच असते. त्यामुळे विद्यमान CNG वाहने किंवा गॅस पायाभूत सुविधांमध्ये कोणताही तांत्रिक बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही.
'गोवर्धन' प्रकल्प काय?
या (CNG-PNG Biogas) योजनेअंतर्गत शहर गॅस वितरण (CGD) कंपन्यांना नियमित CNG मध्ये टप्प्याटप्प्याने बायो-सीएनजी मिसळणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
- 2026-27: 3% मिश्रण
- 2027-28: 4% मिश्रण
- 2028-29: 5% मिश्रण
बायो-सीएनजी (CNG-PNG Biogas) उत्पादकांना प्रति MMBTU ₹2,110 दर निश्चित करण्यात आला असून, नवीन प्रकल्पांसाठी प्रति टन दैनिक उत्पादन क्षमतेमागे ₹2 कोटींपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच पाइपलाइन जोडणी आणि MSME कर्जासाठीही आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वाहन उद्योगाला होणार फायदा
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा यांसारख्या कंपन्यांच्या CNG वाहनांना भारतात मोठी मागणी आहे. या योजनेमुळे स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, इंधन आयातीवरील खर्च कमी होईल आणि CNG वाहनधारकांना कोणतेही तांत्रिक बदल न करता विद्यमान वाहने वापरता येतील, असा सरकारचा दावा आहे.