Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

आज भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘श्रमिक आक्रोश’ मोर्चा

राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.


आज भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘श्रमिक आक्रोश’ मोर्चा

Bharatiya Mazdoor Sangh |

नागपूर (Bharatiya Mazdoor Sangh) : राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात भारतीय मजदूर संघ तसेच संलग्न संघटनांच्या वतीने वेळोवेळी संबंधित विभाग आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. शासन स्तरावर विविध बैठका देखील पार पडल्या, मात्र अपेक्षित प्रमाणात प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांकडून सहकार्य मिळाले नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्यामुळे भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेशच्या वतीने ८ एप्रिल रोजी ‘श्रमिक आक्रोश रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयावर नेण्यात येणार आहे. या मोर्चात विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील राज्य व केंद्र शासनाशी संबंधित विविध उद्योगांतील भा.म.संघ संलग्न संघटनांचे १५ हजारांहून अधिक महिला व पुरुष प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
हरियाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्या नोकरीस सुरक्षा द्यावी, महिला आर्थिक विकास मंडळांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधनाऐवजी न्याय्य वेतन देऊन त्यांच्या संस्थांना प्रति सीएमआरसी २५ लाख रुपयांची तरतूद करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, ओसीडब्ल्यू प्रशासनाकडून किमान वेतनाची मागणी केल्यामुळे सेवेतून कमी करण्यात आलेल्या सुमारे १०० मीटर रीडर कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा सेवेत घ्यावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वर्ग-४ महिला कर्मचाऱ्यांना कायम करावे, तसेच नागपूर मेट्रोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मनपा ‘आपली बस’मधील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यासह इतर सुविधा लागू कराव्यात, भंडारा-गोंदिया माथाडी मंडळात कामगारांची नोंदणी सुरू करावी, अभयारण्यात कार्यरत गाईड्सना वनविभागाकडून मानधन द्यावे, तसेच सहकार विभागातील गट सचिव, वीज कंत्राटी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

तसेच, ईएसआय योजनेची वेतन मर्यादा वाढवावी, ईपीएस-९५ अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ करावी, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, नगरपरिषदांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, विविध विभागांतील रिक्त पदे भरावीत आणि लिपिक संवर्गातील वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, अशा अनेक मागण्यांचा यात समावेश आहे.

या रॅलीचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. मलेशम, माजी महामंत्री रवींद्र हिमते, क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र गणेशे, महामंत्री गजानन गटलेवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीताताई चौबे, सह संघटन मंत्री मोहन येणुरे व शिल्पाताई देशपांडे आदी नेते करणार आहेत.

हा मोर्चा सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून सुरू होऊन मुख्यमंत्री सचिवालय येथे धडक देणार असून, तेथे शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

Related to this topic: