Town Planning Department: अर्जुन नगरातील भीषण अपघातात दुचाकीस्वार सुनील देशमुख यांचे दोन्ही पाय निकामी झाले. नगररचना विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे झालेल्या
२०,००० नागरिकांच्या रहदारीसाठी केवळ २० फुटांचा रस्ता;
'टाऊन प्लॅनिंग' आणि बिल्डरांच्या संगनमताचा संतापजनक नमुना
जुने रस्ते नकाशातून ‘गायब’; संतप्त नागरिकांचा प्रशासनाला जाब
अमरावती (Town Planning Department) : शहरातील अर्जुन नगर परिसरात प्रशासकीय अनास्था आणि नगररचना विभागाच्या (Town Planning) चुकीच्या नियोजनाचा एक भीषण परिणाम समोर आला आहे. अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहतुकीमुळे झालेल्या एका भीषण अपघातात ४५ वर्षीय सुनील देशमुख या दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अर्जुन नगर परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, हा अपघात नसून प्रशासनाने केलेला 'बळी' असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले सुनील देशमुख नेहमीप्रमाणे कार्यालयातून घरी परतत असताना, अर्जुन नगरातील हनुमान मंदिर परिसरात एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने दुचाकीला सावरण्यास जागा उरली नाही. या भीषण धडकेत देशमुख टिप्परच्या चाकाखाली आले आणि त्यांचे दोन्ही पाय पूर्णपणे चेंदामेंदा झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे घोषित केले आहे.
प्रशासनाचा 'अर्थपूर्ण' डोळेझाकपणा?
अर्जुन नगर परिसरात (Town Planning Department) आजमितीस २०,००० हून अधिक लोकसंख्या आहे. नियमानुसार इतक्या मोठ्या लोकवस्तीसाठी प्रशस्त रस्त्यांची गरज असताना, नगररचना विभागाने केवळ २० फुटांच्या रस्त्यावर या संपूर्ण लोकसंख्येला वाऱ्यावर सोडले आहे. 'सृष्टी रॉयल पार्क' (सर्वे नं. १६४/१६५, मौजा रहाटगाव) सारखे मोठे निवासी प्रकल्प मंजूर करताना बिल्डरांच्या फायद्यासाठी जुन्या वहिवाटीच्या रस्त्यांचा बळी देण्यात आला आहे. जुन्या नकाशांमधील रस्ते नवीन ले-आउटमध्ये जाणीवपूर्वक गायब करण्यात आले असून, सहायक संचालक नगररचना विभाग यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी न करताच या नकाशांना मंजुरी कशी दिली? असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यायी मार्ग असता तर टळला असता अनर्थ
स्थानिक नागरिकांच्या मते, अर्जुन नगरातील पाण्याच्या टाकीजवळून एसएसडी बंगलो परिसराकडे जाणारा पर्यायी रस्ता नकाशात असूनही तो प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. जर हा मार्ग सुरू झाला असता, तर मुख्य रस्त्यावरील ५० टक्के वाहतूक कमी होऊन आज सुनील देशमुख यांच्यावर ही वेळ आली नसती. टाऊन प्लॅनिंग विभागाने बिल्डरांशी हातमिळवणी करून सामान्य नागरिकांची कनेक्टिव्हिटी तोडल्याचा थेट आरोप रहिवासी करत आहेत.
'सृष्टी रॉयल पार्क' व इतर प्रकल्पांच्या नकाशांची तातडीने पुनर्तपासणी करून गायब केलेले रस्ते मोकळे करावेत.
२०,००० नागरिकांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करावे.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि भ्रष्ट मार्गाने ले-आउट मंजूर करणाऱ्या नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
"प्रशासन आता कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल विचारत, जर येत्या काही दिवसांत यावर ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा अर्जुन नगर परिसरातील समस्त बाधित नागरिकांनी दिला आहे.