Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > महाराष्ट्र

माझा राजा छत्रपती! रायगडावर दुमदुमला जयघोष; ३५३वा शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक दिमाखात संपन्न

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर शनिवारी अभूतपूर्व उत्साह, भक्तिभाव आणि ऐतिहासिक दिमाखात सोहळा पार पडला.


माझा राजा छत्रपती रायगडावर दुमदुमला जयघोष ३५३वा शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक दिमाखात संपन्न

353rd Coronation Anniversary |

जय भवानी, जय शिवाजी'च्या गगनभेदी घोषणांनी शिवमय झाला दुर्गराज रायगड; लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत स्वराज्याचा गौरवशाली सोहळा

रायगड (353rd Coronation Anniversary) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर शनिवारी अभूतपूर्व उत्साह, भक्तिभाव आणि ऐतिहासिक दिमाखात सोहळा पार पडला. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही आलेल्या लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीने अवघा रायगड शिवमय झाला होता. 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता नगारखाना येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शाही विधींनी झाली. युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन करून शाही ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीची भव्य पालखी राजसदरेवर दाखल झाली. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, ढोल-ताशा पथके, लेझीम आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे उपस्थितांना शिवकालीन वैभवाचा अनुभव मिळाला.

सकाळी १० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राजसदरेवरील महाराजांच्या उत्सवमूर्तीला पवित्र जल आणि सुवर्णमुद्रांनी मुख्य सुवर्णाभिषेक करण्यात आला. या वेळी हजारो शिवभक्तांनी भावपूर्ण वातावरणात शिवरायांना अभिवादन केले. राजसदरेवरील मेघडंबरी तसेच संपूर्ण परिसर विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. भगवे ध्वज, पताका आणि ऐतिहासिक देखाव्यांनी रायगडाचे रूपच पालटले होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवसमाधीला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिवसभर पोवाडे, शिवगर्जना, ढोल-ताशे, लोकनृत्य आणि विविध लोककलांच्या सादरीकरणांनी गडावरील वातावरण भारावून गेले होते. उपस्थितांना जणू शिवकाळ प्रत्यक्ष अनुभवत असल्याची अनुभूती मिळाली.

पहाटेपासूनच रायगड किल्ला आणि पायथ्याच्या परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांमधून तसेच देश-विदेशातून आलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला.

दरम्यान, कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष शाही सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दरबार हॉलमध्ये पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला.

दुर्गराज रायगडावरील हा सोहळा केवळ ऐतिहासिक परंपरेचा उत्सव नव्हता, तर शिवरायांच्या विचारांचा, स्वराज्याच्या प्रेरणेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर ठरला. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा ३५३वा शिवराज्याभिषेक सोहळा इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये नोंदला गेला.

Related to this topic: