वोट बचाओ देश बचाओ

निलंग्यात १४ ऑक्टोबरला धडकणार 'वोट बचाओ देश बचाओ' मोर्चा

Vote Bachao Desh Bachao: इंडिया आघाडी आणि समविचारी पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 'वोट बचाओ देश बचाओ' मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी निलंगा येथे

निलंग्यात १४ ऑक्टोबरला धडकणार 'वोट बचाओ देश बचाओ' मोर्चा

Vote Bachao Desh Bachao

 

काँग्रेस सहप्रभारी रेहाना चिश्ती यांची प्रमुख उपस्थिती

लातूर (Vote Bachao Desh Bachao) : इंडिया आघाडी आणि समविचारी पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 'वोट बचाओ देश बचाओ' मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी निलंगा येथे होणारा हा मोर्चा आता सुधारित नियोजनानुसार येत्या १४ ऑक्टोबर २०२६ रोजी निलंगा येथे मोठ्या शक्तिप्रदर्शनाने काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती उपस्थित राहणार असून, आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  

जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, २ ऑक्टोबरपासून संपूर्ण जिल्ह्यात 'लोकशाही बचाव सप्ताह' राबविला जात आहे. या सप्ताहाचाच एक भाग म्हणून निलंगा येथे 'मत बचाओ, देश बचाओ' आणि 'निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हटाव' या मुख्य मागण्यांसाठी जिल्हास्तरीय मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव आणि नियोजनात सुसूत्रता आणण्यासाठी मोर्चाची तारीख बदलून १४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.  

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी सर्वपक्षीय निर्धार
लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करणे हा कोणत्याही एका पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा विषय नसून प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत नाही आणि मताचा योग्य सन्मान होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.  

समविचारी पक्षांचा व्यापक सहभाग
या (Vote Bachao Desh Bachao) आंदोलनाला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि समविचारी संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी व अन्य संघटनांचा सक्रिय सहभाग असणार आहे. 

हातात तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलने (Vote Bachao Desh Bachao) करून संपूर्ण जिल्ह्यात लोकशाही बचावाचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून, १४ ऑक्टोबर रोजी निलंगा येथे निघणाऱ्या या मोर्चात जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिक, शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बापूसाहेब उजेडकर, रघुनाथ कुचेकर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, शंकर रांजणकर,महादेव कलमुकळे,शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. उदय गवारे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड संजय मोरे, कॉम्रेड विश्वंभर भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड.विजय जाधव, बालाजी कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टैग्स: Vote Bachao Desh Bachao