शिक्षण आयुक्त कार्यालयाला शिक्षकांचा घेराव
संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांना विरोध; पुण्यात महासंघ व विज्युक्टाचा महामोर्चा
पुणे (Teacher MahaMorcha) : ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांविरोधात राज्यातील हजारो शिक्षकांनी शुक्रवारी पुण्यात महामोर्चा काढत शिक्षण आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. महासंघ आणि विज्युक्टाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले. मोर्चाला वेळेवर परवानगी नाकारण्यात आली होती; मात्र शिक्षकांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषामुळे आंदोलन करण्यात आले.
“संचमान्यतेचे घातक निकष लादून राज्यातील हजारो शिक्षकांचा कार्यभार संपवण्याचा शासनाचा डाव आहे,” असा आरोप महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात आला.
‘शिकवायला शिक्षक मिळावा’ यासाठी संघर्ष
मोर्चाच्या समारोपावेळी डॉ. अशोक गव्हाणकर यांनी संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती शिक्षकांना दिली. “शिकवायला शिक्षक मिळावा” यासाठी हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण सहआयुक्त डॉ. श्रीराम पानझाडे यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलनाचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर शिक्षण संचालक महेश पालकर, डॉ. सुधीर तांबे, आमदार दत्तात्रय सावंत आणि संघटना प्रतिनिधी यांच्यात विविध मागण्यांवर चर्चा झाली.
तुकडी टिकवण्याच्या निकषांबाबत चर्चा
यावेळी तुकडी टिकवण्याचे प्रचलित निकष कायम ठेवणे, प्रात्यक्षिकासाठी २० विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करणे, ४५ मिनिटांची तासिका, मुलींची संख्या विचारात घेऊन तुकडी टिकवणे, मान्य विषयाचा कार्यभार जोडणे तसेच तुकडीसाठी किमान विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे, अशा विविध मागण्यांवर अनुकूल चर्चा झाली. या मागण्यांबाबतचा विषय शासन पातळीवर पाठवून धोरणात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
महिला शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
या (Teacher MahaMorcha) आंदोलनात केंद्रीय कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी, शिक्षक आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संचमान्यतेच्या निकषांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांचा परिणाम केवळ शिक्षकांच्या रोजगारावरच नव्हे, तर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या शिक्षकसंख्येवर आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसून विद्यार्थी, शिक्षणव्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासनाने शिक्षकांच्या मागण्यांचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच शिक्षकांचा कार्यभार कायम ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध व्हावेत, यासाठी महासंघ व विज्युक्टाचा संघर्ष यापुढेही अधिक संघटित आणि तीव्रपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.