राज्यात साखरेच्या दराने अचानक मोठी झेप घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.
राज्यात साखरेच्या दराने अचानक मोठी झेप घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे. साखरेचा बाजारभाव तब्बल ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्याचे चित्र असून, काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ बाजारात साखरेचा दर ८० रुपये किलोपर्यंत गेला आहे. या दरवाढीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारने साखरेच्या उपलब्ध साठ्याची तातडीने पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे.
राजू शेट्टी यांच्या मते, यंदाच्या हंगामातील उपलब्ध साखरेचा साठा दिवाळीपर्यंत पुरण्यास सक्षम आहे. तसेच पुढील हंगामात देशाच्या गरजेइतके उत्पादन होण्याची शक्यता असताना बाजारात अचानक एवढी मोठी दरवाढ होणे संशयास्पद आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
दरवाढीमागे नेमकं कारण काय?
साखरेच्या किमतीत झालेल्या अचानक वाढीवर भाष्य करताना राजू शेट्टी यांनी बाजारातील परिस्थितीबाबत संशय व्यक्त केला. सरकारच्या नोंदी आणि साखर कारखान्यांकडील उपलब्ध साठा लक्षात घेतल्यास देशात साखरेची कमतरता भासण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरपूर्वी परदेशातून साखर आयात करून देशातील मागणी पूर्ण करणे शक्य नसले तरी सध्याचा शिल्लक साठा आणि आगामी उत्पादन पाहता तातडीने दर वाढण्यामागे अन्य कारण असावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दोन महिन्यांपूर्वीच दरवाढीचे नियोजन झाल्याचा आरोप
राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही कारखानदारांनी आपल्याकडील साखर आधीच विकली असून आता मोठा साठा उपलब्ध नसल्याचे सांगण्यास सुरुवात केल्याचा त्यांचा दावा आहे.
यावरून बाजारात पुढील दोन महिन्यांत साखरेचे दर वाढण्याचा अंदाज आधीच बांधण्यात आला असावा, असा आरोप त्यांनी केला. कमी दरात खरेदी केलेली साखर कारखान्यांच्या गोदामांमध्येच ठेवण्यात आली आणि आता वाढलेल्या किमतीचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
साखर उत्पादनातील रिकव्हरी आणि नोंद नसलेल्या साखरेबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. वाढलेल्या बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी आणि गैरव्यवहारातून तयार होणाऱ्या साखरेशी संबंधित घटकांना होण्याची शक्यता असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
कारखान्यांच्या साखर साठ्याची तपासणी करण्याची मागणी
सध्याचे साखरेचे दर पाहता साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना टनामागे ५०० रुपयांपर्यंतचा दुसरा हप्ता देणे शक्य असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. आधीची साखर कमी दराने विकली असली तरी उर्वरित साखरेतून मिळणारा भाव संपूर्ण वर्षातील गाळप झालेल्या उसावर विभागला तरी शेतकऱ्यांना ४०० ते ५०० रुपये देणे शक्य असल्याचा त्यांचा दावा आहे.
त्यामुळे सरकारने प्रत्येक साखर कारखान्याकडे प्रत्यक्षात किती साखर शिल्लक आहे, याची माहिती तातडीने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गरज पडल्यास अचानक तपासणी करून कारखानदारांनी दाखवलेल्या साठ्याइतकीच साखर प्रत्यक्षात उपलब्ध आहे की त्यापेक्षा अधिक, हे तपासण्याची सूचनाही त्यांनी केली.
साखरेच्या वाहतुकीवरही नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. बाजारात जाणाऱ्या साखरेच्या ट्रकची तपासणी करून त्यांच्याकडे योग्य पावत्या आहेत का, तसेच जीएसटी न भरता साखरेची वाहतूक होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
देशभरात साखरेच्या काळ्या बाजारातून २० ते २२ हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराची शक्यता असल्याचा संशय घेण्यास वाव असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
कोणत्या जिल्ह्यात साखरेचा किती दर?
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये साखरेच्या किरकोळ दरात मोठी तफावत दिसून येत आहे.
- सांगली: ८० रुपये प्रति किलो
- बुलढाणा: ७८ ते ८० रुपये प्रति किलो
- वाशिम: ७८ ते ८० रुपये प्रति किलो
- कोल्हापूर: ७५ रुपये प्रति किलो
- नाशिक: ७५ रुपये प्रति किलो
- अमरावती: ७५ रुपये प्रति किलो
- यवतमाळ: ७५ ते ७८ रुपये प्रति किलो
- पुणे: ७२ रुपये प्रति किलो
- परभणी: ७० रुपये प्रति किलो
- सातारा: ७० रुपये प्रति किलो
- पालघर: ६५ ते ७० रुपये प्रति किलो
- लातूर: ७० रुपये प्रति किलो
- हिंगोली: ७० रुपये प्रति किलो
- गोंदिया: ७० रुपये प्रति किलो
- नागपूर: ६८ ते ७० रुपये प्रति किलो
- जळगाव: ६८ रुपये प्रति किलो
- भंडारा: ६८ रुपये प्रति किलो
- नांदेड: ६५ रुपये प्रति किलो
- अकोला: ६५ रुपये प्रति किलो
- रत्नागिरी: ६२ रुपये प्रति किलो
- वर्धा: ६२ ते ६४ रुपये प्रति किलो
- मुंबई: काही ठिकाणी ६० ते ६५ रुपये प्रति किलो
- चंद्रपूर: ६० रुपये प्रति किलो
- गडचिरोली: ६० रुपये प्रति किलो
साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत असताना, या दरवाढीमागील नेमकी कारणे शोधून बाजारातील साठा आणि व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी आता पुढे आली आहे.