चिखली (Somthana Triple Murder Case) : सोमठाणा (ता. चिखली) येथे तीन एकर जमिनीच्या बक्षीसपत्राच्या वादातून घडलेल्या धक्कादायक तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर याने पनवेल (मुंबई) येथे आत्मसमर्पण केल्यानंतर चिखली पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन १० सप्टेंबरच्या रात्री चिखली पोलिस ठाण्यात आणले होते.
दरम्यान, आज ११ ऑक्टोबर रोजी मुख्य आरोपी दीपक सुरडकर यास चिखली न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी जगदीश दीपक सुरडकर हादेखील अटकेत असून, आता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शोकाकुल वातावरणात
जमिनीच्या वादातून सरस्वतीबाई सुरडकर, संजय सुरडकर आणि रणजीत सुरडकर या (Somthana Triple Murder Case) तिघांची निघृण हत्या करण्यात आली होती. शेलूद येथे त्यांच्यावर संयुक्त अंत्यसंस्कार करण्यात आले असून तिन्ही मृतदेहांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला.
घटनेची पार्श्वभूमी व कायदेशीर कारवाई
तीन एकर शेती बक्षीसपत्राद्वारे पुतण्याच्या नावावर केल्याच्या रागातून आरोपींनी हे क्रूर कृत्य घडवून आणले होते. याप्रकरणी फिर्यादी मुक्ता संजय सुरडकर यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिस ठाण्यात आरोपी दीपक सुरडकर व जगदीश सुरडकर यांच्याविरुद्ध अप. क्र. ८९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भूषण गावंडे, विजय किटे, सुनील राजपूत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.