Vishwasrao Khandagale passes away: ज्येष्ठ शिवसैनिक आणि चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव प्रल्हादराव खंडागळे यांचे आज, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन
चिखली (Vishwasrao Khandagale passes away) : शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख असा संघटनात्मक प्रवास करणारे ज्येष्ठ शिवसैनिक आणि चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव प्रल्हादराव खंडागळे (Vishwasrao Khandagale) (वय ६५, मूळ रा. बोरगाव काकडे, हल्ली मु. गांधीनगर, चिखली) यांचे आज, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. गळ्यात शेवटच्या श्वासापर्यंत भगवा रुमाल घालून वावरणारे आणि सर्वांमध्ये 'बाळासाहेब' म्हणून अत्यंत लोकप्रिय असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाने चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विश्वासराव खंडागळे (Vishwasrao Khandagale) यांनी ऐन तारुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. बोरगाव काकडे येथील शाखाप्रमुख पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख ते तालुकाप्रमुख पदापर्यंत पोहोचला. पक्षाच्या सर्वच आंदोलनांमध्ये त्यांनी नेहमी हिरिरीने भाग घेतला. चिखली पंचायत समितीचे सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आले व त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा ठसा उमटवला.
व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी तरुण वयातच चिखली शहरात 'शिवकृपा स्टेटशरी'च्या माध्यमातून पदार्पण केले. स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्केटचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शिवसेना-भाजपा युतीच्या निवडणूक प्रचार यंत्रणेत त्यांचा मुख्य सहभाग असायचा. पक्षभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचे अत्यंत आपुलकीचे व दृढ संबंध होते. गावागावांतील थेट संपर्कामुळे ते संपूर्ण तालुक्यात सर्वपरिचित होते.
आज त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व नागरिकांनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी धाव घेत अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी राऊतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही शिवसेना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाला भगवा ध्वज अर्पण करून अखेरचा प्रणाम केला. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे.