राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या योजना

वगळलेल्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा तात्काळ लाभ द्यावा! 

National Food Security Yojana: अपात्र लाभार्थी शोधून त्याची पडताळणी करून राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या योजनेतून वगळण्याची कार्यवाही सुरू केल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत- राज्य आयोग

वगळलेल्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा तात्काळ लाभ द्यावा! 

National Food Security Yojana

 

राज्य अन्न आयोगाची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांना शिफारस

लातूर (National Food Security Yojana) : अपात्र लाभार्थी शोधून त्याची पडताळणी करून राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या योजनेतून वगळण्याची कार्यवाही सुरू केल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत. याबाबत राज्य आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असून राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या लाभापासून कोणीही पात्र कुटुंबीय वंचित राहणार नाही, याकरिता सदर कार्यवाहीमुळे वंचित झालेल्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करुन पात्र असल्यास त्याचा लाभ तात्काळ सुरु करण्याची शिफारस राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एडवोकेट महेश ढवळे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाचे पत्रांन्वये त्यांनी आरसीएमसी प्रणालीवरील शिधावाटप डेटाबेस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, रस्त वाहतुक व महामार्ग मंत्रालय व पीएम- किसान यांच्या डाटाबेस सोबत तपासणी केलेली असून त्यातुन अपात्र लाभार्थी शोधुन त्यांची पडताळणीकरुन त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधुन वगळण्याची कार्यवाही राज्यात केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अनेक कुटुंबे ही एकत्रित कुटुंबे असून त्यात एखादी व्यक्ती आयकर भरणारी किंवा चार चाकी वाहन असणारी असल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या योजनेतून वगळण्यात आल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीत यामुळे अशा कुटुंबावर अन्याय होत आहे. त्यात विशेषत: अनेक शेतकरी व शेतमजुरांची कुटुंबे आहेत.

त्यामुळे अशा वंचित कुटुंबांचे पडताळणी करून त्यांना लाभ द्यावा, अशी शिफारस राज्य अन्न आयोगाने केली आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या तहसीलदारांनी  अपात्रतेबाबत नोटीस देऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची बाजारभावा प्रमाणे वसुली करण्याचे पत्र लाभार्थ्यांना दिल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेऊन पडताळणी करावी, अशी शिफारस राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एडवोकेट महेश ढवळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

तूर्तास आपले स्तरावरुन राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच सर्व उपनियंत्रक शिधावाटप मुंबई/ ठाणे यांना उपरोक्त नमुद परिस्थितीच्या अनुषंगाने यापूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा (National Food Security Yojana) लाभ घेणारा लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे तसेच वंचित झालेल्यांना तपासणी करुन त्यांचा लाभ पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश होणे आवश्यक आहे असे वाटते. तरी संबंधितांना तात्काळ लेखी आदेश निर्गमित करुन होणाऱ्या कार्यवाहीअंती नागरिकांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षेची हमी निर्माण करावी, असेही या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना देण्यात आले आहे.