मुंबई (Mumbai Most polluted city) : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वायुप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरल्याचा दावा करण्यात आला असून, जागतिक स्तरावरही शहराचा पाचवा क्रमांक नोंदविल्याची माहिती आहे. मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 173 वर पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
हवेची गुणवत्ता खालावण्यामागे मंदावलेले वारे, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि प्रतिकूल हवामान ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने प्रदूषित हवा विखुरण्याची प्रक्रिया मंदावल्याचे सांगितले जात आहे. त्यातच (Mumbai Most polluted city) शहरात सुरू असलेल्या सुमारे 11 हजार बांधकामांमधून तसेच विविध विकासकामांतून उडणारी धूळ प्रदूषणात भर घालत आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळेही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील विविध भागांमधील हवेच्या गुणवत्तेतही मोठी तफावत दिसून आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गोवंडी येथे 184, जुहू येथे 182, बोरिवली येथे 153, भांडुप आणि कुर्ला येथे प्रत्येकी 151, तर देवनार आणि वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथे प्रत्येकी 145 AQI नोंदविण्यात आला. भांडुप पश्चिमेतील खिंडीपाडा परिसरात सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद झाल्याचेही वृत्त आहे.
वाढत्या प्रदूषणाला (Mumbai Most polluted city) आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकाम प्रकल्प आणि विविध आस्थापनांसाठी नियमावली लागू केली आहे. बांधकामस्थळे धूळ पसरणार नाही अशा प्रकारे झाकणे, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करणे आणि हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी मापन यंत्रणा बसविणे अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. मात्र, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
शहरातील 222 हवा गुणवत्ता मापन केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवरील नोंदी समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. कांदिवली पश्चिम, मुलुंड पश्चिम आणि शिवडी या भागांचा त्यात समावेश आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबईचा सरासरी AQI 127 म्हणजेच मध्यम श्रेणीत होता. मात्र, पावसाळा संपल्यानंतर प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या वायुप्रदूषणामुळे (Mumbai Most polluted city) नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याने प्रदूषणाची स्थिती कशी राहते, याकडे लक्ष लागले आहे.