Rain Water Crisis: राज्याती शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत, शेतात पिके उभी आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीवर पाण्याचा ताण
सोयाबीन, तूर, कपाशीला पाण्याची गरज
कोरडवाहू शेतकऱ्यांचा आभाळाकडे टक लावून पाहण्याशिवाय पर्याय नाही
दीपक पं देशमुख
अकोला (Rain Water Crisis) : राज्यातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत, शेतात पिके उभी आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीवर पाण्याचा ताण निर्माण झाला असून, हाती आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रात्रीचा दिवस करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर केवळ आभाळाकडे पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
भारतीय हवामान विभागाच्या विभागनिहाय अंदाजानुसार १६ ते २२ ऑगस्टदरम्यान कोकण-गोव्यात सातही दिवस ५० ते ७५ टक्के ठिकाणी, तर विदर्भात सुरुवातीला ५० ते ७५ टक्के आणि नंतर २५ ते ५० टक्के ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Water Crisis) होती. मध्य महाराष्ट्रात १९ ऑगस्टनंतर २५ टक्क्यांपेक्षा कमी ठिकाणी, तर मराठवाड्यात सातही दिवस २५ टक्क्यांपेक्षा कमी ठिकाणी पावसाचा अंदाज होता.
यंत्रणा आताच सज्ज ठेवावी
पावसाची उघडीप आणखी वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे शासनाने पंचनामे, पीकनुकसान नोंदणी, चारा-पाणी नियोजन आणि संभाव्य दुष्काळी मदतीची यंत्रणा आताच सज्ज ठेवावी. संकट गडद झाल्यानंतर मदतीच्या घोषणा करण्याऐवजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची ठोस तयारी सरकारने दाखवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हवामानाचा फटका शेतकऱ्यांनी एकट्याने सोसायचा आणि सरकारने केवळ पाहत बसायचे, हा प्रकार आता थांबला पाहिजे.
विभागनिहाय तीन आठवड्यांचा पावसाचा अंदाज
कालावधी : १८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६
विभाग पहिला आठवडा
१८ ते २४ ऑगस्ट दुसरा आठवडा
२५ ते ३१ ऑगस्ट तिसरा आठवडा
१ ते ७ सप्टेंबर
-कोकण-गोवा ५०–७५% ठिकाणी पावसाची शक्यता ५०–७५% ठिकाणी पावसाची शक्यता २५–५०% ठिकाणी पावसाची शक्यता
-मध्य महाराष्ट्र २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता
-मराठवाडा २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता २५% पेक्षा कमी ठिकाणी पावसाची शक्यता
-विदर्भ ५०–७५% ठिकाणी पावसाची शक्यता २५–५०% ठिकाणी पावसाची शक्यता २५–५०% ठिकाणी पावसाची शक्यता
शेतकरी सल्ला : हवामानाच्या अंदाजानुसार पीक व्यवस्थापन करावे. हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी स्थानिक हवामान विभागाशी संपर्कात राहावे.
स्रोत : भारतीय हवामान विभाग (IMD)