लातूर जिल्ह्यात श्री गणरायाचे जोरदार स्वागत!
लातूर (Latur Shri Ganraya) : ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपारिक हलगींच्या निनादात व अनेक ठिकाणी झांज पथकांच्या गर्जनेत लातूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे आगमन मोठ्या हर्षोल्हासात करण्यात आले. घरोघरी आकर्षक रांगोळी काढून व सजावटी करून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'तुज मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एकदंता!', अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. विविध ठिकाणी गणरायाला पावसासाठी साकडे घालण्यात आले.
हरितालिका व श्री गणरायाचे (Latur Shri Ganraya) आगमन असा दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्याने हरितालिका उपवासासह श्री गणरायांच्या आगमनासाठी लातूर शहरासह जिल्ह्यात घरोघरी लगबग दिसून आली. हरितालिका पूजेच्या साहित्यासह श्री गणरायाच्या आगमनासाठी लागणारे पूजा आदी साहित्य खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी भक्तांची झुंबड उडाली होती. श्रीफळ, बेलफुले, दूर्वा, आगरडा, मकाचे कणीस, सजावटीचे साहित्य यासह मोदक, पेढे, मिठाई, चुरमुरे आदी प्रासादिक साहित्य खरेदीसाठी भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजा साहित्य विक्रीसाठी किरकोळ विक्रेत्यांनी शहरात सर्वत्र आपली दुकाने थाटली होती. लातूर शहरात सुभाष चौक, विलासरावजी देशमुख मार्ग, आदर्श कॉलनी, महात्मा बसवेश्वर चौक, अंबाजोगाई रोड, दयानंद कॉलेज परिसर आधी विविध भागात आकर्षक गणेश मूर्तींचे स्टाल लावण्यात आले होते. या ठिकाणाहून मूर्ती नेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
ढोल ताशांच्या गजरात, हलगींच्या निनादात गणरायांचे विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार व दणकेबाज स्वागत केले. शहरात गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेसह अतिरिक्त पोलीस दल पोलीस प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आले होते. विविध मंडळांनी आगमनानंतर मनोभावे प्रतिष्ठापना करीत पहिली आरती करून प्रसाद वाटून पावसासाठी गणरायाला साकडे घातले.
लातूर शहरासह जिल्ह्यात जवळपास 5000 गणेशोत्सव मंडळांनी (Latur Shri Ganraya) श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत श्री गणरायाचे स्वागत उत्साहात केले. गणेश चतुर्थीच्या दिवशी लातूर शहरातील व ग्रामीण भागातील गावागावांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायांचे विराजमान झाले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठा गजबजल्या होत्या. गणपती स्टॉलवर गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी लहान-थोरांसह मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
फटाक्यांचीही आतिषबाजी!
फुलहारांच्या स्टॉलवर भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली असून, प्रत्येकजण आपल्या बाप्पासाठी आकर्षक रोषणाई साहित्य, खरेदी करताना चेहऱ्यावर भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन हर्षोल्हासात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतिशबाजी करत बाप्पांचे विविध गणेश मंडळांसह घरोघरी थाटात स्वागत करण्यात आले. एकंदर लातूर शहर गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी न्हाऊन निघाल्याचे दिसून आले.