जबरदस्तीने माघार घ्यायला लावली; पोलिसात गुन्हा दाखल!
निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात महायुतीचे कराड यांच्यासह उमेदवाराचा ठिय्या!
लातूर (Latur District Bank) : 'तू उमेदवारी माघार घे, अन्यथा तुझ्या कुटुंबाचे बरे-वाईट करू', अशी धमकी देत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी रेणापूर तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील उमेदवार रवि धनराज जाधव यांचे अपहरण करून उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावला व एका हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवार सर्जेराव मोरे यांच्यासह ८ ते १० जणांविरूद्ध लातूरच्या एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आपणास न्याय द्यावा, या मागणीसाठी रवी जाधव यांच्यासह भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या दिला. दरम्यान या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Latur District Bank) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. या दरम्यानच्या काळात निवडणूक रिंगणातील काही उमेदवार आपली उमेदवारी माघार घेत आहेत. बुधवारी, (दि.२८ ऑक्टोबर) रेणापूर तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून रवी धनराज जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र आपले एका गाडीमधून अपहरण करून जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावला व एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले, अशी तक्रार जाधव यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यावरून या प्रकरणात या गटातील उमेदवार सर्जेराव मोरे यांच्यासह ८ ते १० जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना रवि धनराज जाधव (वय ३३, रा. टाकळगाव) म्हणाले की, आपल्या गावातील शरद कदम यांनी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दयानंद गेट जवळ बोलावले. तिथे जाताच एका गाडीत बसवून पैशाचे आमिष दाखवून 'तू उमेदवारी माघार घे, अन्यथा तुझ्या कुटुंबाचे बरे वाईट करू', अशी धमकी प्रतिस्पर्धी उमेदवार सर्जेराव जनार्धनराव मोरे (रा. पोहरेगाव) व शरद कदम (रा. टाकळगाव) आणि इतर ८ जणांनी दिली. हॉटेल आरोमा येथे नेऊन परत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन जबरदस्तीने रेणापूर तालुका सोसायटी गटातून माझी उमेदवारी माघार घेण्यास भाग पाडले. नंतर लातूर मधील हॉटेल राजधानी (लॉज) मधील रूम नं. २०८ मध्ये डांबून ठेवले व आपल्यावर पाळत ठेवली. रात्री आपण उशिरा तिथून सुटका करून घेण्यात यशस्वी झालो, असे ते म्हणाले.
याबाबत जाधव यांच्या तक्रारीवरून लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्जेराव मोरे, शरद कदम आणि इतर ८ जणांविरूद्ध कलम १४० (३), १२७(१) (ए) (बी), १२३(२) लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरे यांचा भ्रमणध्वनी बंद!
दरम्यान या (Latur District Bank) सर्जेराव मोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.