PSI Amol Gangalwad: खटकाळी भागाकडे जाणार्या रेल्वे उड्डानपुलाखाली शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा रेल्वेने कटलेल्या अवस्थेत मृतदेह
हिंगोली (PSI Amol Gangalwad) : शहरातील खटकाळी भागाकडे जाणार्या रेल्वे उड्डानपुलाखाली शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा रेल्वेने कटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाल्या बाबतची हिंगोली शहर पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.
याबाबत (PSI Amol Gangalwad) पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मागील काही महिन्यांपूर्वी परभणी जिल्हा पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड (४०) हे हिंगोली जिल्हा पोलीस दलामध्ये रुजू झाले होते. मध्यंतरी ते जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षामध्ये होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड हे २९ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर हजर असताना सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास पूर्णा ते अकोला पॅसेंजर रेल्वे क्रमांक ७७६१३ च्या खाली कटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
त्यांचे शरीर धडापासून वेगळे झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कुमार मस्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक राहूल घुले,पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्वेâ, अशोक धामणे, सुनील अंभोरे, बाबासाहेब कांबळे, जमादार शेख अमजद, दिलीप लेकुळे, फालाजी डवरे,आकाश बोथीकर तसेच लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल विलास शिखरे अंकुश बांगर यांच्यासह रेल्वे पोलीस बलाचे व्ही. पी. सिंग यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फॉरेन्सिक पथक आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांची स्कुटी क्रमांक एम.एच.१७ सी. एन.४८३० हि सुध्दा आढळून आली. पोलिस मुख्यालयात मयत अमोल गंगलवाड यांच्या मृतदेहास शोक सलामी देण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.
या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मयत अमोल गंगलवाड यांचा भाऊ नितीन गंगलवाड यांनी माहिती दिली. ज्यामध्ये पोउपनि अमोल गंगलवाड हे कर्तव्यावर असताना सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज वाघमारे हे करीत आहेत.
चांडोळा गावी अंत्यसंस्कार
मयत अमोल गंगलवाड हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा या गावातील रहिवासी आहेत. त्यांना हिंगोलीतील पोलिस मुख्यालयात शोक सलामी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी चांडोळा येथे नेण्यात आला. या ठिकाणी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.
नुकतीच पोउपनि गंगलवाड यांची कन्वेक्शन कक्षात झाली होती बदली
जिल्हा पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांची २७ ऑगस्ट ला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी त्यांची कन्वेक्शन कक्षामध्ये बदली केली होती.याबाबतचे आदेशही काढण्यात आले होते.
अनेक ठिकाणी बजावले कर्तव्य
मयत अमोल गंगलवाड यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोली त्यानंतर अहिल्या-नगर, परभणी नंतर हिंगोली जिल्ह्यात कर्तव्य बजावले आहेत. विशेष म्हणजे गंगलवाड यांनी गडचिरोली येथे सी-६० पथकात कर्तव्य बजावतांना त्यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.