पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुंबईत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीचे फलीत
हिंगोली (Hingoli Industrial Area) : येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव उच्चस्तरीय समितीपुढे लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी मंत्रालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत दिले.
हिंगोलीतील लिंबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये (Hingoli Industrial Area) सुमारे ७० उद्योगघटक कार्यरत असून, त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या उद्योगांमधून सुमारे ९०० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एमआयडीसीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्यात सध्या चार औद्योगिक क्षेत्रे कार्यान्वित असून, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी अतिरिक्त हिंगोली टप्पा-१, टप्पा-२ आणि हिंगोली एमएसएमई पार्क अशा तीन नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाची कार्यवाही सुरू आहे. लीगो प्रकल्पाला बाधा न येता पर्यायी शासकीय जमिनीवर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे पर्यायही तपासण्यात येत आहेत.

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी ८ जुलै २०२१ रोजी उद्योगक्षेत्राच्या मागणीचे पत्र सादर केले होते. त्यानुसार अतिरिक्त (Hingoli Industrial Area) हिंगोली औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र.१ करीता कामठा, येलकी, जरोडा व डोंगरगाव पुल या परिसरात जमिनीच्या उपलब्धतेची पाहणी सुध्दा पूर्ण झालेली आहे. नांदेड येथील एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी या पाहणी अंती २०५.७९ हेक्टर जमिन उपलब्ध असुन ईसापूर धरणाचे पाणी उपलब्ध असल्याचा अहवाल यापूर्वी दिली आहे. यासोबतच वारंगा फाटा, दाभडी व कुर्तडी या भागातील ४३२.२६ हेक्टर आर जमिनीची पाहणी करण्यात आली आहे. हे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र नांदेड विमानतळ व रेल्वे स्थानकापासून ३५ - ४० कि.मी. अंतरावर असुन औद्योगिक वापराकरीता ईसापूर धरणाचे पाणी उपलब्ध असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे.
यासोबतच औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथे एमएसएमई पार्क विकसित करण्यासाठीही उद्योग विभागाने सकारात्मकता दाखविली आहे. यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, पालकमंत्री कार्यालय प्रमुख संजय पवार, प्रणव पांडे ,तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ना उद्योग जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा बनवायचाय्
हिंगोली जिल्ह्याच्या (Hingoli Industrial Area) स्थापनेपासून जिल्ह्यावर ‘ना उद्योग जिल्हा’ असे कलंक लागले आहे. हे कलंक मिटविण्यासाठी जिल्ह्यात अधिकची औद्योगिक क्षेत्रे निर्माण करण्यासाठी मागील विधानसभेपासून आपले प्रयत्न आहेत, असे आ.संतोष बांगर यांनी दै.देशोन्नतीशी बोलताना सांगितले. याकरीता २०२१ मध्ये आपण पत्रे दिली होती व तेंव्हापासून या मागणीचा पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहीमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनावर घेऊन प्रयत्न केल्यामुळे हे शक्य होत असल्याने आ.संतोष बांगर यांनी सर्वांचे आभार मानले.