Bribery ACB Action: र्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्यांचा समावेश आहे.
५१ `क्लास वन`, ८५ `क्लास टू`चा समावेश
मुंबई/ वर्धा (Bribery ACB Action) : वर्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्यांचा समावेश आहे. लाचखोरीची रक्कम २ कोटी ८१ लाख १० हजार ७९० रुपये असल्याचे एसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे.
लाचलूचपत विभागाने कारवाई केलेली २०१४ ते २०२६ पर्यंतची २१७ प्रकरणे संबंधितांना निलंबीत करण्याकरीता पाठविली होती पण या लाचखोरांवर अद्याप कोठलीही कारवाई झालेली नाही. त्यात ३७ क्लास वन, ४४ क्लास टू, १२५ क्लास थ्री तसेच इतर ११ जणांचा समावेश आहे. सगळ्यात कहर म्हणजे २०१३ ते २०२६ या कालावधीत लाचखोरीच्या गुन्ह्यात शिक्षा होऊनही बडतर्फीची कारवाई न झालेले २८ लाचखोर अद्यापही मोकाट असल्याची माहिती समोर येत आहे.
शासनाकडे लाचखोरी संबंधातील १०८, सक्षम अधिकार्याकडे विभागनिहाय चौकशीचे ३४८, अशी एकूण ४५६ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात प्रकरणे सादर करून ९० दिवसांपेक्षा कमी कालावधी झालेल्या ९६ तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या ३६० प्रकरणांचा समावेश आहे. त्यात पोलिस खात्यातील ८७, महसूल खात्यातील ४७, नगरविकास खात्यातील ४६, ग्रामविकास खात्यातील ४३, शिक्षण विभागातील ३७, आरोग्य विभागातील १५, सहकार आणि पणन विभागातील १२, कृषी विभागातील ८ प्रकरणांचा समावेश आहे.
मुंबई विभागात लाचखोरीची २२ प्रकरणे (Bribery ACB Action) दाखल होत त्यातील आरोपींची संख्या ३४ आहे. ठाणे विभागातील ६१ प्रकरणातल्या आरोपींची संख्या ८५, पुणे विभागातील ८६ गुन्ह्यात आरोपींची संख्या १२१, नाशिक विभागातील १०६ गुन्ह्यात आरोपींची संख्या १७१, नागपूर विभागातील ४३ गुन्ह्यात आरोपींची संख्या ६२, अमरावती विभागातील ४७ गुन्ह्यातल्या आरोपींची संख्या ६५, छत्रपती संभाजीनगर विभागातील ७३ गुन्ह्यातील आरोपींची संख्या ९७, नांदेड विभागातील ३७ गुन्ह्यातील आरोपींची संख्या ४८, अशा एकूण ४७५ गुन्ह्यांतील आरोपींची संख्या ६८३ सांगितली गेली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार मागील १० वर्षांत ९ हजार १२३ जण लाच घेण्याच्या सापळ्यात अडकले.