ESIC Yojana: पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.
ESICची मोठी योजना; बेरोजगार विमाधारक कर्मचाऱ्यांना देणार 90 दिवसांपर्यंत 50% पगार
नवी दिल्ली (ESIC Yojana) : नोकरी गमावलेल्या विमाधारक कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला आता 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.
या (ESIC Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने बेरोजगार होण्यापूर्वी किमान 12 महिने विमायोग्य रोजगारात असणे आवश्यक आहे. तसेच, बेरोजगारीपूर्वीच्या 12 महिन्यांतील एका पूर्ण योगदान कालावधीत किमान 78 दिवस ईएसआयसीमध्ये योगदान केलेले असणे गरजेचे आहे. गैरवर्तन, टाळेबंदी, निवृत्ती किंवा ईएसआय कायद्यांतर्गत चुकीचे निवेदन केल्यामुळे झालेल्या बेरोजगारीला या योजनेचा लाभ मिळत नाही.
थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम
योजनेअंतर्गत (ESIC Yojana) दावा प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे बेरोजगारीच्या काळात कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते.