प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
अमरावती (Congress candidate Prof. Aditi Pohare) : ''केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,'' असा निर्धार व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखविण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे (Prof. Aditi Pohare) यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. अदिती पोहरे (Prof. Aditi Pohare) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस भवन येथे आयोजित सभेत सपकाळ बोलत होते.
यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे (Prof. Aditi Pohare), खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख,आ.अमित झनक, आमदार साजिद पठाण, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार राजकुमार पटेल, विलास इंगोले, बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, दिलीप एडतकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचनमाला गावंडे,जयश्री वानखडे, हरिभाऊ मोहोड आदी उपस्थित होते. राहुल गांधी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी यासाठी लढा देत असल्याचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले की, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसची संघटनात्मक ताकद दाखविण्याची संधी आहे. अदिती पोहरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.शक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी काँग्रेसला मिळत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. देशभरात शिक्षण क्षेत्रात असंतोष असल्याचा दावा करीत त्यांनी काँग्रेसने शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतल्याचे नमूद केले.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर विभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. सभेला काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने तहान लागल्यावर विहीर खोदलेली नाही'
काँग्रेसने या निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेमुळे उमेदवाराची घोषणा काही काळ प्रलंबित होती. आता चित्र स्पष्ट झाले असून अदिती पोहरे यांच्या रूपाने काँग्रेसने उमेदवार दिला आहे. ''काँग्रेसने तहान लागल्यावर विहीर खोदलेली नाही,'' असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
पोहरे कुटुंबाचा आचार-विचार आणि व्यवहार काँग्रेससोबत राहिला आहे. हा संबंध पुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'जुने मतभेद विसरा, कामाला लागा'- यशोमती ठाकूर
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. उमेदवार काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर असल्याने आता कोणताही किंतु-परंतु ठेवण्याचे कारण नाही. जुने मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत आवाज देणार'-अदिती पोहरे
काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी आपली नाळ जोडलेली असल्याचे सांगितले. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची ग्वाही देत त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांच्या विषयांना विधान परिषदेत आवाज देण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळावा, असे आवाहन (Prof. Aditi Pohare) त्यांनी केले.
‘काँग्रेसचा विजय निश्चित; शिक्षक मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकविणार’- बबलू देशमुख
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आधीपासूनच तयारी सुरू केली असून, निवडणुकीचे नियोजनही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता केवळ उमेदवाराची घोषणा झाली असली तरी काँग्रेसची संघटनात्मक तयारी आधीपासूनच झालेली आहे. शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरला असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.