काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार अदिती पोहरे यांचा प्रशासनाला रोखठोक सवाल
शिक्षकांना बिगर-शैक्षणिक कामांत अडकवून शिक्षणाचा बोजवारा उडवला;
प्राधान्यक्रमाचे प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन
चिखली (Congress candidate Aditi Pohare) : "देशातील आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शाळांवर आणि शिक्षकांवर नवनवीन शासन निर्णय (GR), जाचक नियम आणि अटी लादल्या जातात; मात्र ज्या शाळा स्व-अर्थसहाय्यित किंवा बिनाअनुदानित आहेत, तेथील शिक्षकांना कोणत्याही प्रकारची नोकरीची, आर्थिक अथवा वैद्यकीय सुरक्षा दिली जात नाही. प्रशासनाकडून कसलीही मदत मिळत नसताना केवळ नियमांची सक्ती कशासाठी?" असा रोखठोक सवाल काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अदिती पोहरे (Congress candidate Aditi Pohare) यांनी उपस्थित केला.
चिखली येथे 13 ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान आयोजित बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अदिती पोहरे यांची प्रमुख वक्तव्ये (Key Statements):
"देशात शिक्षण व्यवस्थेबाबत काहीतरी ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. माझे वडीलही एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याने नवीन नियम, नवे GR आणि सातत्याने बदलणारा syllabus (अभ्यासक्रम) यावर सातत्याने चर्चा व्हायची. तेव्हा असे वाटायचे की कुणीतरी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. जेव्हा काँग्रेस पक्षाकडून मला ही उमेदवारी मिळाली, तेव्हा ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारली."
"अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील तफावत आज तीव्र झाली आहे. स्व-अर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षक नवी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहेत. तरीही त्यांना पे-स्केल, जॉब सिक्युरीटी किंवा निवृत्तीनंतर वैद्यकीय सुरक्षेसारखे मूलभूत हक्क मिळत नाहीत. शासनाकडून मदत शून्य, पण संचमान्यता आणि कडक नियमांची अंमलबजावणी मात्र यांच्यावरच लादली जाते."
"आज शिक्षकांना मूळ शिकवण्याच्या कामापासून दूर ढकलले जात आहे. ऑनलाइन डेटा एंट्री, पोर्टलवर माहिती भरणे, बीएलओ (BLO) आणि एसआयआर (SIR) ची ड्युटी शिक्षकांवर लादली जाते. हे काम कंत्राटी पद्धतीने बाहेरील लोकांकडून करून घेणे शक्य असताना शिक्षकांना यात अडकवले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे."
"शासनाकडून मदत मिळत नसेल, तर हे जाचक आणि कडक नियम शिथिल झालेच पाहिजेत. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विधान परिषदेत शिक्षकांचा खंबीर आवाज बनण्यासाठी मी रिंगणात उतरले आहे. येत्या २३ तारखेला होणाऱ्या मतदानात मला पहिल्या पसंतीचे (First Preference) मत देऊन संधी द्यावी," असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिकेचा निर्धार
आपल्या भाषणात अदिती पोहरे (Congress candidate Aditi Pohare) यांनी स्पष्ट केले की, शिक्षकांचे प्रश्न केवळ मानधनापुरते मर्यादित नसून संचमान्यता, अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पुनर्वसन आणि ऑनलाईन कामांचा अवाजवी ताण हे गंभीर विषय आहेत. येत्या २३ तारखेला होणाऱ्या पसंतीक्रमाच्या मतदान पद्धतीचा संदर्भ देत त्यांनी मतदारांना १, २, ३ अशा प्राधान्यक्रमाने मतदान करताना आपल्या नावासमोर '१' क्रमांकाचे प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
13 ऑक्टोबर 2026 रोजी अदिती पोहरे (Congress candidate Aditi Pohare) यांनी चिखली तालुक्यातील राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी महाविद्यालय ,राधाबाई खेडेकर विद्यालय ,नगरपरिषद विद्यालय ,करम शैक्षणिक संस्था ,अनुराधा फार्मसी कॉलेज, महाराणा प्रताप विद्यालय बेराळा आधी ठिकाणच्या प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मतदार बंधू-भगिनी समोर आपले विचार व आपली भूमिका मांडली विविध संस्थेचे पदाधिकारी वडीलधारी शिक्षक वृंद यांच्याशी संवाद साधत त्यांनी आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासोबत प्रामुख्याने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्नी मृणालिनीताई सपकाळ हिरकणी पतसंस्थेच्या अध्यक्ष वृषालीताई, बोंद्रे ,दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्ती संपादक राजेश राजोरे, प्राचार्य पी एस वायाळ, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, रामेश्वर पाटील, प्राचार्य अनंतकुमार चेके, मेहकर तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार ,चिखली तालुका प्रतिनिधी समाधान गाडेकर, नितीन सपकाळ,पुरुषोत्तम दंदाले, तसेच विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक, काँग्रेस पदाधिकारी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.