Officer Sanjay Chaudhary: चिखली तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी संजय चौधरी यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी याच्या हस्ते ‘जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळ अधिकारी’
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार
चिखली (Officer Sanjay Chaudhary) : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चिखली तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी संजय चौधरी (Officer Sanjay Chaudhary) यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद दादा जाधव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या हस्ते ‘जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळ अधिकारी’ म्हणून प्रमाणपत्र देऊन विशेष गौरविण्यात आले होते या उल्लेखनीय यशाबद्दल चिखली नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी संजय चौधरी यांचा २४ ऑगस्ट 2024 रोजी नगरपरिषद कार्यालयामध्ये विशेष सत्कार करत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. यावेळी आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, नगरपरिषद विरोधी पक्षनेते डॉक्टर महम्मद ईसरार, पत्रकार समाधान गाडेकर,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक , भाजपा पदाधिकारी सिद्धेश्वर ठेंग, श्याम वाकतकर ,अनिल एंडाईत प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध शासकीय योजना आणि उपक्रमांत जिल्ह्यात अव्वल
संजय चौधरी (Officer Sanjay Chaudhary) यांनी सन २०२५-२६ या वर्षात महसूल व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे:
निवडणूक कामकाज व SIR: आपल्या पर्यवेक्षीय क्षेत्रातील BLO कडून जिल्ह्यात सर्वप्रथम १००% SIR चे काम पूर्ण करून घेतले.
महसूल व डिजिटल उपक्रम: ई-फेरफार, शासकीय वसुली, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि ई-हक्क प्रक्रियेत जिल्ह्यामध्ये अग्रक्रम मिळवला.
iGOT कर्मयोगी: केंद्र सरकारच्या iGOT कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्मवर १ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने कोर्सेस पूर्ण केले.
लोककल्याणकारी उपक्रम: पारधी समाज शिबिर, आदिवासी ग्राम व दत्तक ग्राम योजना, शेतपांदण रस्ते आणि विविध शासकीय दाखल्यांचे वाटप अत्यंत पारदर्शकतेने पार पाडले.
प्रशासकीय व राजकीय मान्यवरांची उपस्थिती
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला बुलढाण्याचे आमदार संजूभाऊ गायकवाड, सिंदखेडराजाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात, पोलीस अधीक्षक तांबे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी २०१७-१८ मध्ये ७/१२ संगणकीकरणाच्या उत्कृष्ट कामाबद्दल तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच भारत निवडणूक आयोग दिल्ली येथे उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्तेही चौधरी यांचा सत्कार झालेला आहे. त्यांच्या या नवीन बहुमानाबद्दल चिखली तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.