पोलीस ठाण्यात निवेदन सादर; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वरोरा (Ravana Burning Ban) : दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहनावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी वरोरा तालुक्यातील आदिवासी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महात्मा राजा रावण (Ravana Burning Ban) यांना आराध्य दैवत मानणाऱ्या आदिवासी समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना रावण दहनामुळे दुखावल्या जात असल्याचे सांगत समस्त आदिवासी ‘सगा’ समाजाच्या वतीने वरोरा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. तसेच, समाजाच्या भावना दुखावणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
समाजमाध्यमांवरील पोस्टमुळे वादाला तोंड
आदिवासी समाजाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून रावण दहनाच्या प्रथेविरोधात विविध ठिकाणी जनजागृती केली जात आहे. अशातच, वरोऱ्यात यंदा रावण दहन जल्लोषात होणार असल्याचा दावा करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर प्रसारित झाल्याने वाद निर्माण झाला. या (Ravana Burning Ban) पोस्टमुळे समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित पोस्ट प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
रावण दहनाची प्रथा थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. तालुक्यात कुठेही रावण दहनाचा प्रकार घडल्यास आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या (Ravana Burning Ban) प्रकरणामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती
वरोरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करताना बाळूभाऊ गेडाम, ज्येष्ठ आदिवासी नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य चिंतामणजी आत्राम, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, साहित्यिक दत्तात्रय गावंडे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप धानोरकर उपस्थित होते. यांच्यासह आनंद गेडाम, सतीश गेडाम, सूरज पेंदोर, मनोज पेंदोर तसेच आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला.