७७० पैकी ७४४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क;
महिला मतदारांचे १०० टक्के मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी
रिसोड (Amravati Teachers' Constituency Election) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत रिसोड तालुक्यात उत्स्फूर्त मतदान झाले. तालुक्यातील एकूण ७७० मतदारांपैकी ७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे रिसोड तालुक्यात ९६.५० टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, तालुक्यातील सर्व १२९ महिला मतदारांनी मतदान केल्याने महिला मतदारांचे मतदान १०० टक्के झाले.रिसोड तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजता मतदान सुरू होण्यापूर्वीच (Amravati Teachers' Constituency Election) शिक्षक मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुलनेने शांतता होती.
मात्र, दुपारी दोन वाजल्यानंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढली आणि मतदान केंद्रात लांबच लांब रांगा लागल्या. सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत एका महिला मतदाराने आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन मतदान केंद्रावर उपस्थिती लावली. या घटनेने मतदान प्रक्रियेदरम्यान उपस्थितांचे लक्ष वेधले. मतदान केंद्राबाहेर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक शोधण्यासाठी तसेच आवश्यक सहकार्य करण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारले होते. दिवसभर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून मतदारांना सहकार्य करत होते.
यंदाची अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Amravati Teachers' Constituency Election) प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोप आणि विविध घडामोडींमुळे चर्चेत राहिली. त्यामुळे मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.रिसोड येथील मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी जबाबदारी सांभाळली, तर झोनल ऑफिसर म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली. यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रिसोड तालुक्यातील मतदानाची आकडेवारी:
एकूण मतदार : ७७०
पुरुष मतदार : ६४१
महिला मतदार : १२९
एकूण मतदान : ७४४ (९६.५० टक्के)
पुरुष मतदान : ६१५
महिला मतदान : १२९ (१०० टक्के)
मतमोजणी : २७ ऑक्टोबर २०२६