मुंबई पोलिसांकडून तपास सुरू, प्राथमिक चौकशीत कॉल बनावट असल्याचा संशय
मुंबई (Actor Tusshar Kapoor) : बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देऊन खंडणी उकळण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेता तुषार कपूर यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीशी संबंधित हॅरी बॉक्सर अशी करून दिल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर तुषार कपूर (Actor Tusshar Kapoor) यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार कपूर (Actor Tusshar Kapoor) यांना एका अज्ञात व्यक्तीचा धमकीचा फोन आला होता. संबंधित व्यक्तीने आपण हॅरी बॉक्सर असल्याचे सांगत अभिनेत्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच तुषार कपूर (Actor Tusshar Kapoor) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेल आणि गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्याचे समजते.
आवाजाच्या तपासणीतून बनावट कॉलचा संशय
या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी कॉलची ध्वनिमुद्रिका तपासण्यास सुरुवात केली. फोनवरील व्यक्तीच्या आवाजाची तुलना हॅरी बॉक्सरच्या उपलब्ध आवाजाशी करण्यात आली. मात्र, दोन्ही आवाजांमध्ये साम्य आढळले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचे नाव वापरून अभिनेत्याला घाबरवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. संबंधित फोन नेमका कुठून करण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानेही वाढली होती चिंता
दरम्यान, अलीकडेच अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) यांच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. 18 ऑक्टोबर 2026 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या BMW कारला लक्ष्य केले होते. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावले होते; मात्र त्यांचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती होते. एकीकडे टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) यांच्या कारवरील गोळीबाराची घटना आणि दुसरीकडे तुषार कपूर (Actor Tusshar Kapoor) यांना मिळालेली खंडणीची धमकी, यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गँगस्टरच्या नावाचा वापर करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकारांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.