अमित शाह यांच्यावरील कथित टिप्पणीशी संबंधित प्रकरण
सुलतानपूर, उत्तर प्रदेश (Rahul Gandhi Case) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने 26 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्याची माहिती समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या कथित टिप्पणीशी संबंधित हा खटला 2018 पासून सुरू होता.
सुनावणीदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वतः न्यायालयात उपस्थित होते. तक्रारदाराने केलेल्या आरोपांच्या आधारे सुरू असलेल्या या खटल्यात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेण्याची मागणीही करण्यात आली होती. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणात निर्णय देण्यात आल्याचे वृत्त आहे.
2018 मध्ये नेमका वाद कसा सुरू झाला?
या प्रकरणाची सुरुवात मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाली. त्या वेळी बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत टिप्पणी केली होती. या वक्तव्यामुळे अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा आरोप भाजप नेते विजय मिश्रा यांनी केला होता. त्यानंतर 4 ऑगस्ट 2018रोजी त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. विजय मिश्रा हे सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत.
सुरुवातीला हे प्रकरण दिवाणी न्यायालयात होते. त्यानंतर त्याची सुनावणी खासदार-आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात सुरू झाली. या खटल्याच्या निमित्ताने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते.
दुसऱ्या याचिकेवरही यापूर्वी निर्णय
दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कथित मुस्लिमविरोधी वक्तव्याशी संबंधित आणखी एक स्वतंत्र याचिका सुलतानपूर येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुजफ्फरनगरमध्ये सुमारे 13 वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींच्या संदर्भातील कथित वक्तव्यावरून ही याचिका दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही मुस्लिम तरुणांचा संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडणारे वक्तव्य केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. अधिवक्ता मोहम्मद अन्वर यांनी या प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात खटला चालवण्याची मागणी केली होती. मात्र, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी ही याचिका फेटाळली होती.