Budruk Police Raid: लातूर येथील वाढवणा बुद्रुक पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला; काही आरोपी फरार.
अर्धे आरोपी फरार होण्यात यशस्वी!
लातूर (Budruk Police Raid) : गेली अनेक महिने सुरू उमरगा (मन्ना) शिवारात राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अखेर वाढवणा बुद्रुक पोलिसांनी छापा टाकण्याचे धाडस दाखवले. या छाप्यातून मोठा गुन्हा उघडकीस आणला असून या कारवाईत 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी एका पत्रकात म्हटले आहे. मात्र या प्रकरणातील काही जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी काही जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या कारवाईत एकूण २३,४१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाढवणा (बु.) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. मन्ना उमरगा येथील शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळील लिंबाच्या झाडाखाली काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत (Budruk Police Raid) असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुपारी १५.१५ वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकली. यात काही मंडळी “तिर्रट” नावाचा जुगार पत्त्यांच्या साहाय्याने खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले. या कारवाईत संभाजी दिगांबर पाटील (वय २८ वर्षे, रा. डाऊळ, ता. उदगीर), शिवकांत विश्वनाथ मिरजगावे (वय ३३ वर्षे, रा. खेर्डा, ता. उदगीर), शिवकुमार राजेंद्र शेळके (रेड्डी) (वय ३८ वर्षे, रा. टाकळी, ता. उदगीर), लईकोद्दीन शाहबुदीन चौधरी (वय ५२ वर्षे, रा. उदगीर), विलास दशरथ दहीकांबळे (वय ३५ वर्षे, रा. हाळी, ता. उदगीर), ज्ञानेश्वर नरसिंग सारोळे (वय २७ वर्षे, रा. निडेबन, ता. उदगीर) या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अजित श्रीधर राठोड, बालाप्रसाद ऊर्फ प्रविण सत्यनारायण गिल्डा, गोविंद बाबुराव चव्हाण (रा. निडेबन), पवन सत्यनारायण गिल्डा, ऋषिकेश वाघमारे (रा. खेर्डा) हे आरोपी फरार झाले.
यावेळी (Budruk Police Raid) पोलिसांनी पत्त्याचे साहित्य, मोटारसायकली असा एकूण २३ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात येथे गुन्हा क्रमांक ६९/२०२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बळदे हे करीत आहेत. पोलीस अंमलदार बळदे, शिवप्रताप रंगवाळ यांनी ही कारवाई केली. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.