Hingoli local crime: हिंगोलीमध्ये, सोशल मीडियावर तलवारीचे फोटो शेअर करून दहशत पसरविणाऱ्या आरोपी सचिन गणेश बोराळेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli local crime) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्या अवैध हालचालींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सोशल मीडियावर पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. १३ एप्रिल रोजी सोशल मीडिया पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सचिन गणेश बोराळे, रा. माळी गल्ली, कळमनुरी याने हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या (Hingoli local crime) पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्हेगारास कळमनुरी शहरातून ताब्यात घेतले. त्याच्या जवळून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे व आकाश टापरे यांच्या पथकाने केली.