Sengaon Illegal Gutkha: सेनगाव पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत ५ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन आरोपींना ताब्यात घेतले गेले आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सेनगाव (Sengaon Illegal Gutkha) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.२० वाजताच्या सुमारास सेनगाव पोलिसांनी रिसोड–सेनगाव मार्गावर एका हॉटेलजवळ सापळा रचला. यावेळी कारमधून अवैध गुटखा वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी तात्काळ कार अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा (Sengaon Illegal Gutkha) आढळून आला. त्यानंतर २ एप्रिल रोजी पहाटे १२.२१ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत सुमारे १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा गुटखा, ३ लाख ५० हजार रुपयांची कार व मोबाईल असा एकूण ५ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील भोगावा देवी येथील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई गजानन सरकटे, राम मारकळ, पी.सी. डांगे, संतोष जाधव, चालक क्षीरसागर व नामदेव जाधव यांच्या पथकाने पार पाडली. अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी सेनगाव पोलीस सातत्याने कठोर पावले उचलत असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.