Sengaon Youth Dead Body: सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात एका अज्ञात 25 वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. त्याच्या हातावर 'Mom Love Dad' असा टॅटू आहे, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हत्येचा संशय.मृताच्या हातावर 'Mom Love Dad', टॅटू
अनोळखी मृतदेहाचे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सेनगाव (Sengaon Youth Dead Body) : तालुक्यातील उमरदरी पाटी शिवारात बुधवार ८ एप्रिल रोजी सकाळी एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा घातपात करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरदरी पाटी परिसरातील निर्जन शिवारात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती 8 एप्रिल ला बुधवारी सकाळी ग्रामस्थांना मिळाली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने या (Sengaon Youth Dead Body) घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना दिली. मृत तरुणाच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने हा प्रकार खुनाचा असावा, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
ओळख पटवण्यासाठी पोलिसांसमोर आवाहन
मयत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे असून, त्याच्या शरीरावर काही विशिष्ट खुणा आढळल्या आहेत. त्याने अंगावर पांढऱ्या रंगाचा 'Puma' कंपनीचा टी-शर्ट आणि निळसर रंगाची स्पोर्ट्स, नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या एका हातावर 'Sachita' व पावलाचे चिन्ह गोंदवलेले असून दुसऱ्या हातावर 'Mom Love Dad' असा टॅटू आहे. या वर्णनाचा कोणताही तरुण कोणाच्या माहितीत असल्यास किंवा बेपत्ता असल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व हवालदार जीवन मस्के यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तांत्रिक पुरावे व सूक्ष्म तपासणीसाठी हिंगोली येथून फॉरेन्सिक (न्यायवैद्यक शास्त्र) विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाचे नमुने संकलित केले आहेत. तसेच श्वानपथक ही घटना स्थळी आले होते.
सदर तरुणाची हत्या नेमकी कोठे व कोणी केली?
मृतदेह (Sengaon Youth Dead Body) या ठिकाणी आणून टाकला की येथेच हा प्रकार घडला? या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. या घटनेमुळे उमरदरी परिसरात दहशतीचे सावट असून, सेनगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान अनोळखी मृतदेहाची ओळख कोणाला पटल्यास त्यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले 7038833358 पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे 8459864152 यांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी भेट देऊन गुन्ह्या संदर्भात माहिती घेतली. सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याकरता हिंगोली जिल्ह्यासह लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांना माहिती देण्यात आली आहे.